'देशातील तरुणपिढीला नशेच्या आहारी घालवण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र', नाना पटोलेंचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 16:06 IST2022-12-15T16:06:01+5:302022-12-15T16:06:31+5:30
Nana Patole: केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून ड्रग्जच्या तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानेच ही परिस्थिती उद्धवल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

'देशातील तरुणपिढीला नशेच्या आहारी घालवण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र', नाना पटोलेंचा गंभीर आरोप
मुंबई - भारताकडे तरुणांचा देश म्हणून पाहिले जात असून १६ ते ४० वयोगटातील देशातील लोकसंख्या ५० टक्के आहे, ही तरुणपिढी देशाचे भवितव्य आहे. देशाचे भवितव्य असेलली ही पिढीच नशेखोर बनत असून देशातील १० ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याने त्याची दाहकता किती आहे हे स्पष्ट होत आहे. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून ड्रग्जच्या तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानेच ही परिस्थिती उद्धवल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, तरुण पिढी नशेच्या आहारी जाणे आपल्या देशाच्या भविष्यासाठी चांगले नाही. अंमली पदार्थांची तस्करी मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. गुजरातच्या मुंद्रा या खाजगी बंदरात हजारो टन ड्रग्ज आल्याचे देशाने पाहिले, अशा घटना एकदाच घडलेल्या नसून अनेकवेळा घडलेल्या आहेत. जेएनपीटी बंदरातूनही अंमली पदार्थाचा साठा असलेला कंटनेर जप्त करण्यात आला होता. बंगरुळुमध्येही तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. देशात वेगवेगळ्या प्रकारच्या अंमली पदार्थांची तस्करी राजरोस होत असताना त्यावर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याचेच या घटनांवरून दिसते.
मुंबईत काही सेलिब्रिटींच्या घरी दोन-चार ग्रॅम गांजा सापडला तरी त्याचे भांडवल करून मुंबई म्हणजे नशेखोर लोकांचे शहर झाल्याचे चित्र निर्माण करण्याचे काम मविआ सरकार असताना भाजपा व त्यांच्या समर्थकांनी केले होते. हजारो टन अंमली पदार्थ रोखू न शकणारे दोन चार ग्रॅम गांजावर मात्र मोठा आकांडतांडव करत होते. देशात नशा करणारांची वाढती संख्या व त्यावर नियंत्रण मिळवण्यात येत असलेले अपयश ही चिंतेची बाब आहे. राजकारणापेक्षा हा देशाच्या भविष्याचा प्रश्न असून केंद्र सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून नशेच्या आहारी जात असलेल्या तरुण पिढीला त्यापासून परावृत्त करण्याचे काम करावे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.