निकालांमध्ये भाजपाला अनुकूल ट्रेंड, इंडिया आघाडीवर परिणाम होणार? शरद पवारांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 13:33 IST2023-12-03T13:32:28+5:302023-12-03T13:33:07+5:30
Election Result 2023: आज सुरू असलेल्या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. या निकालांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निकालांमध्ये भाजपाला अनुकूल ट्रेंड, इंडिया आघाडीवर परिणाम होणार? शरद पवारांचं मोठं विधान
आज सुरू असलेल्या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून, राजस्थान, मध्य प्रदेश या मोठ्या राज्यांसह छत्तीसगडमध्ये बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे. तर तेलंगाणामध्ये काँग्रेसने बीआरएसला धक्का दिला आहे. या निकालांमुळे काँग्रेससह विरोधी पक्षांच्या आघाडीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या निकालांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या निकालामध्ये भाजपाला अनुकूल ट्रेंड दिसून आला, हे मान्य केले पाहिजे. मात्र या निकालांचा इंडिया आघाडीवर तसेच २०२४ च्या निवडणुकांवर कुठलाही परिणाम होणार नाही, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.
चार राज्यांमधील मतमोजणीचा कल समोर येत असताना शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, चार राज्यांमध्ये मतमोजणी सुरू असून, निकालाचं चित्र सहा नंतर स्पष्ट होईल, त्यामुळे त्यानंतरच त्यावर बोलणं योग्य ठरेल. मात्र आजच्या निकालामध्ये भाजपाला अनुकूल ट्रेंड दिसून आला, हे मान्य केले पाहिजे. मात्र या निकालाचा इंडिया आघाडीवर कुठलाही परिणाम होणार नाही. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवरही त्याचा परिणाम होणार नाही, असं शरद पवार म्हणाले. मात्र महाराष्ट्रात भाजपा आणि मित्र पक्षांची सत्ता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी शरद पवार यांनी तेलंगाणामधील निकालाबाबतही आपलं मत मांडलं. ते म्हणाले की, बीआरएसचं राज्याकडे दुर्लक्ष झालं होतं. तिथे राहुल गांधींच्या झालेल्या यशस्वी सभेनंतर तेलंगाणामध्ये परिवर्तन होणार याचा अंदाज आला, होता, असे शरद पवार यांनी सांगितले.