भाजपा पडली तोंडघशी, मुंबई पालिका सर्वात पारदर्शी
By Admin | Updated: February 2, 2017 08:38 IST2017-02-02T02:24:22+5:302017-02-02T08:38:48+5:30
महापालिकेतील घोटाळ्यांसाठी शिवसेनेला जबाबदार ठरवून प्रचार मोहिमेतून नाकाबंदी करण्याची व्यूहरचना आखणाऱ्या भाजपा नेत्यांना केंद्रातील स्वपक्षीय नेत्यांनी तोंडघशी पाडले

भाजपा पडली तोंडघशी, मुंबई पालिका सर्वात पारदर्शी
मुंबई : महापालिकेतील घोटाळ्यांसाठी शिवसेनेला जबाबदार ठरवून प्रचार मोहिमेतून नाकाबंदी करण्याची व्यूहरचना आखणाऱ्या भाजपा नेत्यांना केंद्रातील स्वपक्षीय नेत्यांनी तोंडघशी पाडले आहे. मुंबई महापालिकेचा कारभार सर्वांत पारदर्शक असल्याचा निष्कर्ष अर्थ मंत्रालयाने आर्थिक पाहणीतून काढला आहे. एका केंद्राच्या या प्रशस्तीपत्रामुळे प्रचारात मोठे अस्त्र ठरणाऱ्या या मुद्द्याची हवाच गेली आहे.
नालेसफाई, रस्ते, कचरा आणि ई निविदा घोटाळा गेल्या दोन वर्षांमध्ये गाजलेल्या या घोटाळ्यांचे भांडवल भाजपाने केले आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर लढणाऱ्या भाजपाने शिवसेनेला चारही मुंड्या चित करण्यासाठी अशी मोर्चेर्बांधणी केली होती. भाजपाच्या सततच्या टिकास्त्राने शिवसेनेचे टेन्शन वाढवले होते. मात्र भाजपाच्याच केंद्रातील अरूण जेटली यांनी महापालिकेच्या पारदर्शक कारभाराचे तोंडभरुन कौतुक केले.
प्रचाराच्या अस्त्राची धार बोथट
ज्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. तोच मुद्दा आता मुख्यमंत्री आणि भाजपला मुंबई पालिका निवडणुकीत अडचणीचा ठरणार आहे. तर शिवसेनेला भाजपविरोधात आता रान उठविण्याची आयती संधी मिळाली आहे. या संधीचा फायदा शिवसेना निवडणूक प्रचारासाठी घेईल, असे म्हटले जात आहे. (प्रतिनिधी)
शिवसेनेचा अभिनंदन ठराव
केंद्रीय नेत्यांनी चांगल्या कारभाराची पोचपावती महापालिकेला दिल्यामुळे भाजपा नेत्यांवर तोंडात बोट घालण्याची वेळ आली आहे. हीच संधी साधून भाजपाला खिजवण्यासाठी शिवसेनेने अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अभिनंदनाचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत आज मांडला. पारदर्शक कारभारात अव्वल असल्याची होर्डिंग्ज शहरात लावण्याची मागणी शिवसेनेने प्रशासनाकडे केली आहे.
अर्थमंत्र्यांच्या या प्रशस्तिपत्रकामुळे सध्यातरी शिवसेनेने भाजपाला कोंडीत पकडले आहे. प्रचारात शिवसेना याच प्रशस्तिपत्रकाचा वापर ढालीसारखा करेल.