“मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देणार”; देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 13:06 IST2024-08-10T12:59:42+5:302024-08-10T13:06:24+5:30
Devendra Fadnavis On Maratha Reservation: मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळाले पाहिजे ही शासनाची भूमिका आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

“मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देणार”; देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार
Devendra Fadnavis On Maratha Reservation: गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक पवित्रा घेताना पाहायला मिळत आहेत. आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचा पुढचा टप्पा सुरू केला असून, या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन केले जात आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करत असताना, दुसरीकडे मराठा समजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्याचा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळाले पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. आरक्षण आणि विकासाच्या सर्व प्रश्नांबाबत चर्चेतून मार्ग काढण्यात येत आहेत. काहीही झाले, तरी मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणाऱ्या आरक्षणाबाबत निर्णय घेणार आहे. मराठा समाज शतकानुशतके समाजातील अठरापगड जाती-जमातींना सोबत घेऊन चाललेला आहे. या समाजाचे आर्थिक, सामाजिक उन्नतीचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मराठा समाजातील तरुणांनी नोकरी देणारे व्हावे
मराठा समाजातील तरुणांनी नोकरी देणारे व्हावे, असे सांगत, मराठा उद्योजक निर्मितीचा एक लाखाचा यशस्वी टप्पा पूर्ण केल्याबद्दल अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे विशेष अभिनंदन केले. मराठा समाजाच्या विकासासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. बँकांच्या माध्यमातून साडेआठ हजार कोटींचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे. जवळपास ८२५ कोटी व्याज परतावा महामंडळाने दिला आहे. महामंडळाने आणखी पाच लाख उद्योजक बनवावेत आणि या उद्योजकांनी २५ लाख नोकऱ्या द्याव्यात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ‘सारथी’सारख्या संस्थांच्या निर्मितीने गरीब शेतकऱ्यांच्या, मराठा समाजातील सर्वसामान्यांच्या तरुणांना स्पर्धा परीक्षांचे दालन उपलब्ध करून दिले आहे. समाज, समाजातील तरुण यांच्या विकासासाठी कार्ययोजना करणे आवश्यक असते; ते ‘सारथी’ने करून दाखविले आहे, असे ते म्हणाले.