मराठा-ओबीसी नेते आरक्षणावरुन आमनेसामने; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 15:40 IST2024-06-21T15:39:19+5:302024-06-21T15:40:22+5:30
BJP DCM Devendra Fadnavis News: ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही समाजाचे नेते दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.

मराठा-ओबीसी नेते आरक्षणावरुन आमनेसामने; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
BJP DCM Devendra Fadnavis News: मराठा आरक्षणासंदर्भातील ‘सगेसोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, मराठा-कुणबी एकच असल्याचा कायदा पारित करावा, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांची पूर्तता करण्यास सरकारला एक महिन्याची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का न लागण्यासाठी लक्ष्मण हाके यांचे आंदोलन सुरू आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा नेते आमनेसामने आल्याचे चित्र आहे. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा दोन्ही समाजातील नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. काही झाले तरी ओबीसीतून आरक्षण मिळावे, यावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, यासाठी ओबीसी समाजातील नेते आग्रही आहेत. मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.
कायद्याच्या चौकटीत राहून हा प्रश्न सोडवणार आहे
दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आमची सह्याद्रीवर बैठक आहे. आमचे अहित केले असे कोणत्याही समाजाला वाटू नये. कायद्याच्या चौकटीत राहून हा प्रश्न सोडवणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दुसरीकडे, आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे आम्हाला आरक्षण दिले पाहिजे. ते टीकलेही पाहिजे, आम्हाला हैदराबादचे गॅझेटही लागू केले पाहिजे. आम्हाला नेहमी यांनी फसवले आहे. कितीही फसवणूक केली तरीही मी समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळवून देणार, तुम्ही आम्हाला फसवले तर आम्ही तुम्हाला डुबवले म्हणून समजायचे. तुम्ही गोड बोलून आम्हाला फसवत आहात, आता आम्ही तुमचा कार्यक्रम करणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
दरम्यान, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने ओबीसी नेते उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. परंतु हाके उपोषणावर ठाम आहेत. ओबीसी आरक्षणास कसा धक्का लागत नाही, सगेसोयरेचे काय , हे सरकारने सांगावे. येथे निवडणुकांच्या माध्यमातून दहशत निर्माण केली जात आहे. हे महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिले आहे. आमच्या प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले नाही तर हे उपोषण सुरुच राहणार. आम्ही लेखी घेतल्या शिवाय उपोषण सोडणार नाही. आमचा जीव गेले तरी चालेल. आमच्या २९ टक्क्याला कुठेही धक्का लागणार नाही, हे लिहून द्यावे. मागच्या दाराने निघालेले ५७ लाख प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांनी केली.