भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
By यदू जोशी | Updated: November 11, 2025 08:51 IST2025-11-11T08:51:07+5:302025-11-11T08:51:27+5:30
Local Body Election: भाजप आणि काँग्रेस या राज्यातील दोन प्रमुख राजकीय पक्षांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार निश्चित करण्यासाठीच्या हालचालींना वेग दिला आहे. या संदर्भात भाजपची बैठक मंगळवारी तर काँग्रेसची बैठक बुधवारी मुंबईत होणार आहे. दोन्हींचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार येत्या पाच दिवसांत जाहीर होतील.

भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
- यदु जोशी
मुंबई - भाजप आणि काँग्रेस या राज्यातील दोन प्रमुख राजकीय पक्षांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार निश्चित करण्यासाठीच्या हालचालींना वेग दिला आहे. या संदर्भात भाजपची बैठक मंगळवारी तर काँग्रेसची बैठक बुधवारी मुंबईत होणार आहे. दोन्हींचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार येत्या पाच दिवसांत जाहीर होतील.
भाजपच्या निरीक्षकांनी प्रत्येक नगर परिषद, नगर पंचायतीत जाऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आणि प्रत्येक ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या तीन संभाव्य उमेदवारांची यादी तयार करून ती जिल्ह्याच्या प्रभारींकडे सोपविली आहे. मंगळवारच्या बैठकीत चर्चा होऊन बरीच नावे ठरतील असा अंदाज आहे.
भाजपच्या निरीक्षकांनी जी प्रत्येकी तीन नावे प्रभारींकडे दिली त्यापैकी कोण निवडून येण्याची अधिक शक्यता आहे याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याचे अहवालही मंगळवारच्या बैठकीत ठेवले जातील. तीन व्यतिरिक्त काही ठिकाणी सर्वेक्षणात चौथे नावही आले आहे, त्यावरही चर्चा होईल. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ नेते उपस्थित राहतील. या बैठकीनंतर कोअर कमिटीची एक बैठक होऊन नावे अंतिम केली जातील असेही सूत्रांनी सांगितले.
भाजपसोबत जायचे नाही; प्रदेश काँग्रेस
महाविकास आघाडी एकसंधपणे सर्व नगर परिषदांमध्ये लढणार नाही हे स्पष्ट झाले आहे. आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. योग्य वाटेल तेथे ते मित्रपक्षांबरोबर जातील किंवा एकटे लढतील. तथापि, कोणत्याही परिस्थितीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांबरोबर उघड वा छुप्या पद्धतीनेही युती करायची नाही असे आम्ही बजावून सांगितले आहे, असे प्रदेश काँग्रेसच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.
काँग्रेसचे विभागीय प्रभारी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विभागीय प्रभारी नेमले आहेत. ते असे- नागपूर विभाग-विजय वडेट्टीवार, पश्चिम महाराष्ट्र-सतेज (बंटी) पाटील, उत्तर महाराष्ट्र-बाळासाहेब थोरात, अमरावती विभाग-यशोमती ठाकूर, मराठवाडा-अमित देशमुख, कोकण-नसीम खान.
सर्वेक्षणांवर जोर
भाजपने नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची नावे अंतिम करण्यासाठी सर्वेक्षणांचा सपाटा लावला आहे. नामवंत सर्वेक्षण संस्थांकडून हे काम करवून घेतले जात आहे. प्रदेश भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेगवेगळी सर्वेक्षणे केली असून एकत्रितपणे त्याचा सारांश काढला जाणार आहे.
कॉंग्रेसचे निरीक्षक कळीचे
काँग्रेस पक्षाच्या प्रदेश निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी होईल. प्रत्येक नगरपालिकेत पाठविलेल्या निरीक्षकांनी सुचविलेल्या नगराध्यक्षांच्या नावांवर तीत चर्चा होईल. भाजप आणि काँग्रेस या दोन्हींच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाची नावे १५ नोव्हेंबर किंवा जास्तीतजास्त १६ नोव्हेंबरला जाहीर होतील. १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख आहे.