Chitra Wagh : "कंगना राणौत, स्वप्ना पाटकर, केतकी चितळेबद्दल आवाज का उठला नाही?"; भाजपाचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 14:46 IST2022-11-08T14:36:04+5:302022-11-08T14:46:04+5:30
BJP Chitra Wagh And Abdul Sattar : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. महिलांचा अपमान ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे अशा वक्तव्याचे समर्थन नाहीच. सगळ्यांनीच भान ठेवा असं म्हटलं आहे.

Chitra Wagh : "कंगना राणौत, स्वप्ना पाटकर, केतकी चितळेबद्दल आवाज का उठला नाही?"; भाजपाचा हल्लाबोल
महाराष्ट्राचे कृषिमंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्या तोंडून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना एक अपशब्द उच्चारला गेला. ५० खोकेंबद्दल होणाऱ्या टीकेबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना जाहीर मुलाखतीत त्यांनी अपशब्दाचा वापर केला. सत्तार यांच्या या शब्दामुळे राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. यानंतर आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "कंगना राणौत, स्वप्ना पाटकर, केतकी चितळेबद्दल आवाज का उठला नाही?" असा सवाल विचारला आहे.
चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचे समर्थन नाहीच. पण महिलांचा अपमान झाल्यावर Selective Outrage कितपत योग्य? कंगना राणौत, स्वप्नाली पाटकर, केतकी चितळेबद्दल आवाज का उठला नाही? महिलांचा अपमान ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे अशा वक्तव्याचे समर्थन नाहीच. सगळ्यांनीच भान ठेवा" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
"दोघांनीही एकमेकांचा आदर-सन्मान ठेवायला हवा"
"प्रत्येक महिलेचा आदर-सन्मान व्हायला हवा. महिलांनीही बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. पुरुषांनी तर सन्मानच केला पाहिजे. पण मी महिला आहे म्हणून मी वाट्टेल ते बोलेन आणि त्याला जर उत्तर आलं तर महिलांची अस्मिता दुखावली गेली असं म्हणत असाल तर ते बरोबर नाही. दोघांनीही एकमेकांचा आदर-सन्मान ठेवायला हवा. उत्तराला प्रत्युत्तर असतं" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
"तुम्हीही मंत्र्यांची गरिमा ठेवायला हवी"
"मागच्या सरकारमध्येही अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. तेव्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपाला म्हटलं होतं की, मुख्यमंत्र्यांची, मंत्र्यांची गरिमा तुम्ही ठेवायला हवी. भाजपा वाट्टेल तसं बोलते. तसंच इथेही आहे. तुम्हीही मंत्र्यांची गरिमा ठेवायला हवी. ते मंत्री आहेत. त्यांच्या खात्याशी संबंधित काही असेल तर तुम्ही नक्की बोला. तुम्ही त्यांना जे बोललात, त्याला ते प्रत्युत्तर आलं आहे. अर्थात, या गोष्टीला माझं समर्थन नाही."
"संजय राऊतांवर का गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत?"
"गेल्या अडीच वर्षांत काही का केलं नाही? संजय राऊतांवर का गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत? एका अभिनेत्रीला हरामखोर म्हणणं हे योग्य आहे का? स्वप्ना पाटकर महाराष्ट्रातील मुलगी नव्हती का? त्यांच्यावर बोलल्यानंतर संजय राऊतांवर का गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत?, त्यावेळी का भूमिका घेतली नाही?" असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"