ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 10:40 IST2025-09-06T10:39:47+5:302025-09-06T10:40:35+5:30
उबाठाची अरेरावी अनेकवेळा सहन करीत, सन्मान, आदर देऊनही भाजपासोबत विश्वासघात करून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी भाजपालाच धोका दिला.

ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
मुंबई - भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय कलगीतुरा कायम पाहायला मिळतो. महाविकास आघाडी बनवत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले, तेव्हापासून भाजपा आणि ठाकरे यांच्यातील संबंध दुरावत गेले. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे उदाहरण देत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. ते ट्रम्प आणि हे पिपाण्या..एवढाच काय तो फरक अशा शब्दात उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना हिणवलं आहे.
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, आपण भारत व रशियाला चीनच्या हाती सोपविले’ अशा आशयाचे हताश उद्धार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोल्डान्ड ट्रम्प यांनी काढले. चांगले मित्र गमावणे हा विश्वासघात, अरेरावी व मुजोरीचा अंतिम टप्पा असतोच. आमच्या महाराष्ट्रातसुध्दा याच गुणांमुळे उद्धवराव व शरद पवार हेच वाक्य म्हणत आहेत, फक्त भारत व रशियाऐवजी वेगळे शब्द आहेत असं त्यांनी म्हटलं.
तसेच उबाठाची अरेरावी अनेकवेळा सहन करीत, सन्मान, आदर देऊनही भाजपासोबत विश्वासघात करून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी भाजपालाच धोका दिला. आता सगळेच गमावून कॅाग्रेसचे अंकित होऊन बसले. भाजपाच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ला असणारा मान आता गेला. आता राहुल गांधीच्या मातोश्रीचा मान राखायला उद्धव ठाकरे दिल्लीला जातात असा टोलाही भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
आपण भारत व रशियाला चीनच्या हाती सोपविले’ अशा आशयाचे हताश उद्धार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोल्डान्ड ट्रम्प यांनी काढले.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 6, 2025
चांगले मित्र गमावणे हा विश्वासघात, अरेरावी व मुजोरीचा अंतिम टप्पा असतोच. आमच्या महाराष्ट्रातसुध्दा याच गुणांमुळे उध्दवराव व शरद पवार हेच वाक्य म्हणत आहेत, फक्त…
भाजपा आणि ठाकरेंमध्ये दुरावा का?
२०१९ पर्यंत राज्यातील राजकारणात भाजपा आणि शिवसेना यांच्यात युतीचं नाते होते. २०१९ ची निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्रित लढवली. परंतु निकालाचे चित्र स्पष्ट झाले तेव्हा मुख्यमंत्रिपदावरून भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यात दुरावा निर्माण झाला. भाजपाने दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप उद्धव ठाकरेंकडून करण्यात आला. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी बनवली आणि राज्यात मुख्यमंत्रिपद मिळवले. उद्धव ठाकरे यांच्या या खेळीने सर्वाधिक जागा जिंकूनही भारतीय जनता पार्टीला विरोधी बाकांवर बसावे लागले. युती तुटली, सत्ता गेली त्यामुळे विरोधात असणाऱ्या भाजपाने आक्रमकपणे मविआ सरकारला टार्गेट केले. त्यानंतर अवघ्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बंडखोरीच्या भूमिकेमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि पुन्हा भाजपाच्या नेतृत्वात सरकार आले. परंतु २०१९ पासून भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा दिवसेंदिवस वाढतच गेला.