BJP Chandrashekhar Bawankule News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि बीड जिल्ह्यातील दहशतीवरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गेले काही दिवस सातत्याने जोरदार हल्लाबोल करणारे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेटल्याचे समोर आल्याने वादळ निर्माण झाले. सुरेश धस यांच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर गदा येणार की काय, अशी परिस्थिती असताना या 'गळाभेटी'ची बातमी समोर आली. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतोष देशमुख प्रकरणावरून भाजपावर टीका केली.
आकाचा आका हे शब्द भाजपाने आणले, आम्ही आणले नाहीत. बावनकुळे आणि फडणवीस यांनी सांगावे की, धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही. धस यांना तेव्हाच थांबवले पाहिजे होते. तेव्हा त्यांना बोंबाबोंब करायला दिली. बीडमध्ये वातावरण निर्मिती केली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार केला. बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांचा नैतिकतेचा बुरखा फाटला आहे, हे स्पष्ट मी बोलतो. मराठा आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपाने सुरेश धस हा मोहरा पुढे आणला. त्यासाठी त्यांनी संतोष देशमुख खुनाचा वापर केला. मग या खून प्रकरणात भाजपाचा हात आहे का? लक्ष विचलित करण्यासाठी हे केले जात आहे. संतोष देशमुखप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी याच्याबाबत लढाई का केली नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. यावर भाजपा नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला.
संतोष देशमुख प्रकरणाकडे राजकारण म्हणून पाहू नये
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, संजय राऊतांचे वक्तव्य म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. संतोष देशमुखाच्या मारेकऱ्याला फाशी व्हावी म्हणून चौकशी सुरू आहे. भडकवण्याचे काम त्यांनी करू नये. देशमुख हत्या ही गंभीर बाब आहे. याकडे राजकारण म्हणून बघू नये, सरकारच्या चौकशीला सगळ्यांनी साथ द्यावी. आरोपीला फाशी झाली पाहिजे. तसेच सुरेश धस संदर्भात वारंवार प्रश्न विचारून राजकारण करू नका, असे बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, आम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही. भाजपाची ही पद्धती नाही. विकसित महाराष्ट्राचा संकल्प आम्ही घेतला आहे. त्या पद्धतीने महाराष्ट्र पुढे नेणार आहे. या संकल्पनेला साथ देण्यासाठी अनेक लोक पक्ष प्रवेश करतात. आमच्या पक्षात या असे कधीही कोणाला म्हणत नाही. जनतेला वाटते भाजपामध्ये गेले पाहिजे. आम्ही त्या लोकांचे स्वागत करतो, असे बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितले.