“दिल्लीत पराभव दिसतोय, राहुल गांधींची रडारड-नौटंकी, सत्य स्वीकारणार नाहीत”; कुणी केली टीका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:26 IST2025-02-07T17:24:59+5:302025-02-07T17:26:50+5:30

BJP Chandrashekhar Bawankule News: विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्वीकारण्याच्या मानसिकतेत अजूनही आलेले नाहीत. पराभव लपवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणे, हा निराशेचा कळस आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

bjp chandrashekhar bawankule replied rahul gandhi criticism on election commission over evm machine | “दिल्लीत पराभव दिसतोय, राहुल गांधींची रडारड-नौटंकी, सत्य स्वीकारणार नाहीत”; कुणी केली टीका?

“दिल्लीत पराभव दिसतोय, राहुल गांधींची रडारड-नौटंकी, सत्य स्वीकारणार नाहीत”; कुणी केली टीका?

BJP Chandrashekhar Bawankule News: ईव्हीएम आणि मतदारांच्या संख्येच्या मुद्द्यावर दिल्लीत काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवरुन निवडणूक आयोग आणि भाजपावर गंभीर आरोप केले. या पत्रकार परिषदेत संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनीही काही आकडेवारी मांडत भाजपा आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. याला आता भाजपाकडून उत्तर दिले जात आहे. 

महाराष्ट्रात पाच वर्षांत जितक्या नव्या मतदारांची नोंद झाली नाही, त्यापेक्षा अधिक मतदार शेवटच्या पाच महिन्यांत नोंदवले गेले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ३९ लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. म्हणजे हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक मतदार या कालावधीत नोंदवण्यात आले. हे मतदार नेमके आले कुठून? आम्ही मागील काही दिवसांत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचा सविस्तर अभ्यास केला आहे. या निवडणुकीत काहीतरी गोंधळ नक्कीच झाला आहे. महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये अनियमितता आढळली आहे, असा दावा करत राहुल गांधी यांनी टीका केली. याला भाजपा महायुती सरकारमधील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर ट्विट करत पलटवार केला. 

राहुल गांधींना दिल्लीत पराभव दिसत आहे, सत्य स्वीकारणार नाहीत

चंद्रशेखर बावनकुळे पोस्टमध्ये म्हणतात की, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत अजूनही आलेले नाहीत. किंबहुना पराभवाच्या त्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. म्हणून आता ते मतदारसंख्येवर संशय घेत आहेत. खरे तर निवडणूक आयोगाने यापूर्वीच मतदार वाढीबाबत वारंवार स्पष्ट उत्तरे दिली आहेत, तरीही दिशाभूल करणारे आरोप करून लोकशाहीची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने केला जात आहे. उद्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यात होणारा पराभव आधीच दिसत असल्यामुळे राहुल गांधी यांची रडारड आतापासूनच सुरू झाली आहे. जनतेने काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना सातत्याने नाकारले आहे, हे वास्तव स्वीकारण्याची त्यांची तयारी नाही. आता पराभव लपवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणे, हा निराशेचा कळस आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. 

दरम्यान, खरे तर या पत्रकार परिषदेत शेजारी बसलेल्या सुप्रियाताई सुळे यांनी ‘मी याच ईव्हीएमवर विजयी झाले’ असे सांगितले होते. पण राहुल गांधी यांना नौटंकी करायची असल्याने ते सत्य स्वीकारणार नाहीत. राहुलजी लोकशाहीवर विश्वास ठेवा, निराधार आरोप करून लोकशाहीची विटंबना करू नका. या देशातील जनतेला आपला खोटारडेपणा आता पुरता कळून चुकला आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: bjp chandrashekhar bawankule replied rahul gandhi criticism on election commission over evm machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.