BJP Chandrashekhar Bawankule News: नाशिकमध्ये ठाकरे गटाचे निर्धार शिबिर आयोजित करण्यात आले होते. ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या शिबिरासाठी आले होते. या शिबिरात संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे एआयचा वापर करून एक भाषण दाखवण्यात आले. यावरून आता भाजपाने ठाकरे गटावर निशाणा साधला.
भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर एक पोस्ट केली असून, या माध्यमातून ठाकरे गटावर टीका केली. धिक्कार...! आपला आवाज कुणी ऐकत नाही, म्हणून आपले विचार हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त उबाठासारखा गटच करु शकतो, असे बावनकुळे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
बाळासाहेबांचा आवाज वापरू नये
मला खात्री आहे, आज ज्यांनी बाळासाहेबांना जनाब ठरविले, ज्यांनी टिपू सुलतानाचे नावं उद्यानांना दिली, वीर सावरकरांचा सकाळी अपमान करणार्या राहुल गांधींच्या गळ्यात सायंकाळी गळे घातले... वक्फच्या विरोधात मतदान केले, राममंदिराला सातत्याने विरोध करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, ३७० रद्द करणार्याला विरोध करणार्यांना पाठिंबा दिला, वाझेसारख्यांकडून वसुली करवून घेतली, डेडबॉडी बॅगमध्येही घोटाळे केले, कोविड काळात खिचडीत घोटाळे केले, मराठी माणसांच्या घरात घोटाळे करुन गल्ले भरले, त्यांच्या बुडावर बाळासाहेबांनी लाथच घातली असती.... ज्या गोष्टींसाठी वंदनीय बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, किमान त्याच्या विरोधात बाळासाहेबांचा आवाज वापरू नये. त्यांचे विचार बुडविलात. किमान मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा असा गैरवापर करू नका, या शब्दांत बावनकुळे यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, वक्फ बोर्डापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघापर्यंत उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवरून शेलक्या शब्दांत भाजपावर टीकास्त्र सोडले. तुम्ही सांगा मला की, कोणी हिंदुत्व सोडले की, भाजपाने सोडले की मी सोडले? आपण वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध जरूर केला. हिंदुत्वाचा आणि वक्फ सुधारणा कायद्याचा काडीचा संबंध नाही. दोन दिवस संसदेत झालेली भाषणे तुम्ही ऐका. सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही जो काही सत्ता जिहाद केला, कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला तुम्ही दूर केले आणि आम्हाला सांगता की, आम्ही हिंदुत्व सोडले, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपाचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.