Maharashtra Politics: “आधी १८ महिने मंत्रालयाने मुख्यमंत्री पाहिले नव्हते, आता १८ तास शिंदे-फडणवीस काम करतात”
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 14:40 IST2023-01-03T14:38:23+5:302023-01-03T14:40:32+5:30
Maharashtra News: एक काळ होता की, फक्त जेव्हा फेसबुकवर सरकार चालू होते. मात्र, आता जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणारे सरकार सत्तेत आले आहे, असे भाजप नेत्याने म्हटले आहे.

Maharashtra Politics: “आधी १८ महिने मंत्रालयाने मुख्यमंत्री पाहिले नव्हते, आता १८ तास शिंदे-फडणवीस काम करतात”
Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्यात अनेकविध विषयांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जय्यत तयारी सुरू केली असून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. तसेच राज्यातील भाजप नेतेही अनेक ठिकाणी जाऊन गाठीभेटी घेत आहेत. यातच आता भाजपकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक करताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार १८ तास काम करते. एक काळ होता की, फक्त जेव्हा फेसबुकवर सरकार चालू होते. १८ महिने मंत्रालयाने मुख्यमंत्री पाहिले नव्हते, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. एकीकडे डबल इंजिन सरकार आणि दुसरीकडे संघटनात्मक बांधणी सुरू आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे जनतेचे सरकार आहे. लोकांची कामे केली जात आहेत. मागच्या सरकारमध्ये फोडाफोडी करून सरपंच केले जात होते. आता थेट सरपंचपदाचा निर्णय घेताच भाजप आणि शिंदे गटाचे सरपंच निवडून आले, असे बावनकुळे यांनी सांगितले.
जिथे शिंदेंचे उमेदवार असतील तिथे आम्ही ताकदीने मदत करू
आमदारांच्या पत्रांवरही मुख्यमंत्री सह्या करत नव्हते. निर्णयांमध्ये सुसूत्रता नव्हती. दहीहंडीसाठी कोरोना होता, पण आयपीएलसाठी नव्हता. नागपूर अधिवेशनासाठी कोरोना होता, असेही सरकार महाराष्ट्राने पाहिले आहे. आता मात्र जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणारे सरकार सत्तेत आले आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत महाराष्ट्रातली प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्र लढू आणि जिंकूही. जिथे शिंदेंचे उमेदवार असतील तिथे आम्ही ताकदीने मदत करू. जिथे भाजपचे उमेदवार असतील तिथे शिंदे गट आमच्या पाठिशी उभा असेल, अशी ग्वाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
दरम्यान, राज्याचा ८० टक्के दौरा पूर्ण झाला आहे. जानेवारी अखेरपर्यंत उर्वरित दौरा पूर्ण होईल. आत्तापर्यंत ४५ जिल्ह्यांचा प्रवास केला. राज्यात २५ लाख युवा वॉरिअर्स काम करणार आहेत. महाराष्ट्रात केंद्राचे ७ कोटी लाभार्थी असून त्यापैकी २ कोटी लाभार्थी पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद म्हणून पत्र देणार आहेत. आत्तापर्यंत ३५ लाख महिलांनी पत्रे दिली आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"