"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 18:54 IST2025-12-21T18:44:50+5:302025-12-21T18:54:57+5:30
सुधीर मुनगंटीवारांनी निकालावरुन नाराजी व्यक्त केल्यानंत मुख्यमंत्र्यांनी त्यांना महापालिकेसाठी आश्वासन दिलं आहे.

"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
CM Devendra Fadnavis On Sudhir Mungantiwar: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालात चंद्रपूरने सर्वांत मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे. विधानसभा निवडणुकीच्या लाटेनंतर अवघ्या काही दिवसांतच चंद्रपुरात भाजपने आपला जनाधार गमावल्याचे चित्र समोर आले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या बालेकिल्ल्यात भाजपला धूळ चारली असून, जिल्ह्यावर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र, या पराभवापेक्षाही भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वपक्षावर ओढलेले ताशेरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिलेले उत्तर सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांपैकी तब्बल ८ जागांवर काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर हा निकाल अनपेक्षित मानला जात आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ प्रत्येकी १ जागेवर समाधान मानावे लागले आहे. वडेट्टीवार यांनी आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केल्याने विदर्भात काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे.
"बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"
आपल्या जिल्ह्यात झालेल्या या पराभवामुळे सुधीर मुनगंटीवार कमालीचे संतप्त दिसले. त्यांनी थेट भाजपच्या कार्यपद्धतीवर आणि मंत्रिमंडळ विस्तारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "या पराभवाचे आम्हाला चिंतन करावे लागेल. काँग्रेसने वडेट्टीवार यांना महाराष्ट्राचा नेता केलं. दुसरीकडे, चंद्रपूर, भंडारा, गोंदियाला एकही मंत्रिपद दिलं नाही, मला तर दिलच नाही पण कोणालाही मंत्रिपद दिलं नाही. ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे," असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.
मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
मुनगंटीवारांच्या या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत शांतपणे पण मार्मिकपणे उत्तर दिले. मुनगंटीवारांची नाराजी दूर करतानाच त्यांनी भाजपच्या इनकमिंग धोरणावरही भाष्य केलं.
"पक्षाला दारं असूच नयेत. पक्षाची दारं कुठल्या व्यक्तीसाठी कुठल्या समाजासाठी बंद असू नयेत. पक्ष हा बिनादाराचाच असला पाहिजे. फक्त प्रवेश देताना व्यक्ती योग्य आहे की नाही, पक्षाचे फायद्याचे आहेत की नाही हे बघितलं पाहिजे. त्यामुळे पक्षाने जे प्रवेश दिले आहेत त्याचा फायदाच झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला विजय मिळालेला आहे. समजा जर सुधीर मुनगंटीवार यांना कुठली ताकद कमी पडली असेल त्याची भरपाई आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीत देऊ. पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडूण आणू," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.