“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 17:51 IST2025-12-12T17:50:36+5:302025-12-12T17:51:34+5:30
BJP Chandrakant Patil: लोकशाहीत पक्षीय संघटना आणि पक्षातील अंतर्गत लोकशाही देखील तितकीच महत्त्वाची ठरते, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
BJP Chandrakant Patil: संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे असते. विविध पक्ष आपल्या विचारधारेप्रमाणे लोककल्याणाचे विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत असतात. सामान्य नागरीकांचे प्रश्न, समस्या, त्यांचे दु:ख मांडण्याचे काम पक्षीय संघटना करते. लोकशाहीत पक्षीय संघटना आणि पक्षातील अंतर्गत लोकशाही देखील तितकीच महत्वाची ठरते, असे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
विधानभवन येथे ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘संसदीय लोकशाहीत पक्ष संघटनेचे महत्व, योगदान व जबाबदारी आणि लोकशाही पुढील आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील बोलत होते. प्रत्येक पक्षाची विचारधारा, व्हिजन वेगवेगळे असू शकते. त्या विचारधारेवर आधारीत कार्यकर्ते तयार होत असतात. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. आमच्या पक्ष संघटनेत प्रत्येक घराचे नियोजन केले जाते. पक्ष संघटना वाढविण्यासाठी असे नियोजन फार महत्त्वाचे ठरतात, असे चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.
नागरिकांचे सहकार्य मिळविण्याचा प्रयत्न होत असतो
संसदीय लोकशाहीत सर्वात खालच्या पातळीवरची आणि गावांचा कारभार पाहणारी संस्था म्हणून ग्रामपंचायत काम करते. केवळ या संस्थेच्या निवडणूका पक्ष विरहीत असतात. त्यानंतर सर्व संस्थांच्या निवडणूका विविध पक्षांच्यावतीने लढविल्या जातात. निवडणूका लढताना पक्षांच्यावतीने आपआपली विचारधारा लोकांपुढे ठेवली जाते. पक्ष संघटनेद्वारे आपले पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामार्फत अधिकाधिक नागरिकांपर्यत विचारधारा पोहोचवून त्याद्वारे नागरिकांचे सहकार्य मिळविण्याचा प्रयत्न होत असतो, असे पुढे बोलतांनी पाटील म्हणाले.
दरम्यान, भारतीय राज्यघटनेने आपल्याला लोकशाही दिली. देशात लोकशाही पद्धतीने राज्य चालते. अशी लोकशाही पक्ष संघटनेत असणे आवश्यक आहे. कोणतीही एक व्यक्ती अनेक काळ पक्ष पदाधिकारी असू नये, दर तीन वर्षांनी पक्ष संघटनेत बदल व्हावे, असे बदल पक्षीय लोकशाहीला बळकट करतात. पक्षीय लोकशाहीत मजबूत विचारधारा पक्षाला मजबूत करत असते, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.