भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) जोरदार हल्लाबोल केला आहे. मराठी शाळांवरून निशाणा साधला आहे. "पेंग्विन सेनेच्या "आदित्य" कारभारामुळे गेल्या १० वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३० मराठी शाळांना टाळे लागले" असं म्हणत टीका केली आहे. तसेच मराठीवरचे प्रेम म्हणजे इंग्रजीच्या फेसात नुसतेच हाऊसफुल्ल असं म्हणत खोचक टोला लगावला आहे.
आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "पेंग्विन सेनेच्या "आदित्य" कारभारामुळे गेल्या १० वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३० मराठी शाळांना टाळे लागले, तर विद्यार्थी संख्या १ लाखावरून ३५ हजारांवर आली. तर... मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राज्यात उच्च व तंत्रशिक्षण आता मराठीतून मिळणार!" असं शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"वा रे वा! मराठी शाळा बंद करुन पब्लिक स्कूल? मराठीचे तथाकथित रक्षणर्त्यांचे मराठी प्रेम म्हणजे थंडा थंडा कूल कूल! किंवा यांचे मराठीवरचे प्रेम म्हणजे इंग्रजीच्या फेसात नुसतेच हाऊसफुल्ल!" असं देखील शेलार यांनी आपल्या आणखी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी याआधी देखील विविध मुद्द्यांवरून आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"