BJP and shivsena cauht hold on congress in case of legislative council opposition leader | ...तर विरोधी पक्षनेतेपद देऊ; भाजपा-शिवसेनेनं काँग्रेसला कोंडीत पकडलं!
...तर विरोधी पक्षनेतेपद देऊ; भाजपा-शिवसेनेनं काँग्रेसला कोंडीत पकडलं!

- अतुल कुलकर्णी 

मुंबई : विधानपरिषदेचे उपसभापतीपद देणार असाल, तरच विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यास मान्यता देऊ, अशी भूमिका भाजप-शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदावर वडेट्टीवार यांची नियुक्ती करावी, असे पत्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना दिले. विरोधकांच्या पत्रावर यशावकाश निर्णय घेतला जाईल असे बागडे यांनी सांगितले. मात्र यशावकाश म्हणजे कधी, हा प्रश्न पडल्यामुळे विरोधकांनी धावपळ सुरू केली. अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली, तेथेही काही तोडगा निघाला नाही. संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सभापती रामराजे निंबाळकर यांची भेट घेत, तुम्ही उपसभापतींचा निर्णय घ्या, आम्ही विरोधी पक्षाचा निर्णय घेऊ असे सांगितल्याचे समजते.

साताऱ्यातील राजकीय रणधुमाळीनंतर सभापती रामराजे निंबाळकर यांनी आपल्याला वेगळा विचार करावा लागेल अशी भूमिका घेतली होती. त्यांनीच राष्ट्रवादी सोडली तर पक्षाची अडचण होईल म्हणून राष्ट्रवादीने उपसभापतीपद शिवसेनेला देण्याची तयारी दर्शविली आहे आणि विरोधीपक्ष नेतेपद काँग्रेसला घेण्यास सांगितले आहे. उद्या सकाळी पुन्हा दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार असून त्यात निर्णय घेतला जाईल. उद्या राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यामुळे कदाचित ही निवड बुधवारी होण्याची शक्यता आहे.

गोऱ्हेंसाठी उपसभापतीपदाचा आग्रह
शिवसेनेने उपसभापतीपदासाठी आग्रह धरला आहे. त्यांना हे पद नीलम गोऱ्हे यांना द्यायचे आहे. त्यांचा कार्यकाळ २०२० पर्यंत आहे. या आधी शिवसेनेच्याच एका गटाला हे पद गोऱ्हे यांना मिळू नये, असे वाटत होते.
तर माणिकराव ठाकरे यांच्यामुळे रिक्त झालेली उपसभापतीची जागा काँग्रेसला हवी आहे. त्यामुळेही गेले दोन अधिवेशन हा प्रस्ताव रखडला आहे. जर काँग्रेसला उपसभापतीपद दिले गेले, तर आम्ही सभापतीपदावर अविश्वास ठराव आणू, असा पवित्रा आता भाजपने घेतला आहे.

येत्या दोन दिवसांत निर्णय होईल. शिवसेनेचा उमेदवार ठरल्याची आपली माहिती आहे. आपला त्यास विरोध असण्याचे कारण नाही.
- रामराजे नाईक निंबाळकर, सभापती, विधानपरिषद

आम्ही नियमानुसार काम करू. विरोधकांचा हक्क त्यांंना मिळेल. यावर आपण सभागृहात घोषणा करू.
- हरिभाऊ बागडे,
अध्यक्ष, विधानसभा


Web Title: BJP and shivsena cauht hold on congress in case of legislative council opposition leader
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.