"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 11:04 IST2025-11-04T11:02:08+5:302025-11-04T11:04:56+5:30
BJP Ameet Satam : मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार अमित साटम यांनी "सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?" असं म्हणत आकडेवारीच शेअर केली आहे.

"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
मतदार याद्यांमधील दुबार नावं हटवून मगच निवडणुका घ्या, अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली असताना आता राज्य निवडणूक आयोगाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना ही दुबार शोधा व दुबार मतदान होणार नाही याची खात्री करा, असे आदेश दिले आहेत. त्यासाठी प्रत्येक बूथवर विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच दरम्यान मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार अमित साटम यांनी "सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?" असं म्हणत आकडेवारीच शेअर केली आहे.
अमित साटम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. धुळे, बीड, अमरावती, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पूर्व या महाराष्ट्रातील पाच मतदारसंघातील मुस्लिम दुबार मतांची आकडेवारी देत विरोधी पक्षांना खोचक सवाल विचारला आहे. तसेच उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधींना टॅग केलं आहे.
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?
महाराष्ट्रातील हे 5 मतदारसंघ पाहा...
- धुळ्यात निवडणूक जिंकले 3831 मतांनी,
मुस्लिम दुबार मते आहेत, 45,797
- बीडमध्ये निवडणूक जिंकले 6553 मतांनी,
मुस्लिम दुबार मते आहेत, 67,679
- अमरावतीत निवडणूक जिंकले 19,731 मतांनी,
मुस्लिम दुबार मते 28,245
- मुंबई उत्तर-मध्य : निवडणूक जिंकले 16,514 मतांनी,
मुस्लिम दुबार मते 59,805
- मुंबई उत्तर-पूर्व : निवडणूक जिंकले 29,861 मतांनी,
मुस्लिम दुबार मते 38,744" असं अमित साटम यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
सांगा, ही मतचोरी आहे की व्होटजिहाद?
— Ameet Satam (@AmeetSatam) November 4, 2025
महाराष्ट्रातील हे 5 मतदारसंघ पहा...
- धुळ्यात निवडणूक जिंकले 3831 मतांनी,
मुस्लिम दुबार मते आहेत, 45,797
- बीडमध्ये निवडणूक जिंकले 6553 मतांनी,
मुस्लिम दुबार मते आहेत, 67,679
- अमरावतीत निवडणूक जिंकले 19,731 मतांनी,
मुस्लिम दुबार मते 28,245
-… pic.twitter.com/XpyQokf3Pw
दुबार मतदारांची नावे एका ठिकाणाहून हटविण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाहीत. मात्र, दुबार मतदान कोणीही करू नये यासाठी आता वेळेवर काय करता येईल, याचा अभ्यास करून राज्य निवडणूक आयोगाने आदेशात असे म्हटले आहे की, ज्या-ज्या मतदारांची दुबार नावे आहेत त्यांची नावे शोधून काढा आणि ते एकाच ठिकाणी मतदान करतील, दोन ठिकाणी मतदान करणार नाहीत याची खातरजमा करा. नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम 6 किंवा 7 नोव्हेंबरला जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता दुबार नावांवर आयोगाने लक्ष केंद्रित केले आहे.
येणाऱ्या निवडणुकीत कसे रोखणार दुबार मतदान?
आता आयोगाने आदेश दिले आहेत की ज्यांची दुबार नावे आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जा, दोनपैकी कोणत्या ठिकाणी त्यांना मतदार म्हणून नाव हवे आहे, ते विचारा आणि उर्वरित पर्यायाच्या नावावर फुली मारा, जेणेकरून ते अन्यत्र मतदान करू शकणार नाहीत. आता बूथ पातळीवरील अधिकारी (बीएलओ) हे अशा दुबार मतदारांच्या घरी जातील. इतके करूनही कुठे दुबार नाव राहिलेच असेल तर मतदार एकाच ठिकाणी मतदान करतील असे त्यांच्याकडून लिहून घेतले जाणार आहे.