‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 08:45 IST2025-04-26T08:45:29+5:302025-04-26T08:45:56+5:30
यूपीएससीच्या अर्जात एक रकाना असतो : छंद कोणता? त्यानं लिहिलं होतं, ‘शीप ॲण्ड गोट्स!’

‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
मेघना ढोके
कोल्हापूर : मातीशी असलेली नाळ इतक्या आत्मविश्वासानं मिरवणाऱ्या त्या तरुणाचं नाव बिरदेव सिद्धपा डोणे. मेंढपाळाघरी जन्मला, पालावर जगला आणि देशातल्या सर्वात मोठ्या प्रशासकीय परीक्षेची मुलाखत द्यायला शेळ्या-मेंढ्यांवरची माया सोबतच घेऊन गेला. ५५१ वी रँक मिळवल्यावर तो सांगतो, ‘माझी माणसं, माझ्या शेळ्या-मेंढ्याच माझी ताकद आहे, त्यांच्यापेक्षा वेगळा मी कसा काय असेन?’ मातीत माखलेले हात अभिमानाने मिरवणारा, जसा आहे तसाच जगासमोर ठाम उभं राहण्याची हिंंमत दाखवणारा बिरदेव यूपीएससी ‘क्रॅक’ करून आता मोठ्ठा ‘साहेब’ होऊ घातला आहे.
शाळकरी वयापासून शेळ्या-मेंढ्या वळणारा हा पोरगा अभ्यासात हुशार. सातवी-आठवीत होता तेव्हा शाळेतल्या शिक्षिका त्याला नेहमी म्हणत, ‘माझ्या डोक्यावरचा अधिकारी हो!’ त्या शिक्षिकेनं दिलेला आत्मविश्वास त्याच्या मनात साहेबाची बीजं पेरून गेला. साहेबांच्या डोक्यावरचा पण एक ‘साहेब’ असतो, ती खुर्ची आपल्याला मिळू शकते! शिष्यवृत्त्या मिळवत त्यानं बारावीनंतर पुण्यात सिव्हिल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवला. ‘पीएसआय’ होण्याचं स्वप्न सोडून त्याचा भाऊ शिपाई म्हणून सैन्यात दाखल झाला. आणि बिरदेवला म्हणाला, ‘तू साहेब हो!’
दिसली भिंत की धडक मारायची ही जिद्द!
पुण्यात इंजिनीअरिंग करता करता यूपीएससीची वाट सोपी नव्हती. मित्रांनी अभ्यासाची, कुणी पैशाची मदत केली. वाटेत येतील त्या सगळ्या परीक्षा बिरदेव देत गेला. दिसली भिंत की धडक मारायची ही जिद्द! दिल्लीत कोचिंगसाठी गेला; पण थोड्या मार्कांसाठी अपयशच वाट्याला आलं. ऐन कोरोना काळात पोस्टात ‘डाक सेवक’ म्हणून नोकरी लागली. पालावरचं पोरगं सरकारी नोकरीत चिकटलं. आता राजीनामा देऊन ‘अभ्यास’ करतो म्हणणं अवघड होतं. बिरदेव सांगतो, ‘टेन्शन आलंच होतं, पण सरकारी नोकरी सोडायची हिंमत केली म्हणून बरं झालं..!’
‘लोकमत’ने तेव्हाच छापलं, मेंढपाळाच्या पोराला व्हायचंय कलेक्टर!
दहावीच्या परीक्षेत बिरदेवला ९६ टक्के गुण मिळाले. तोवर एवढे गुण शाळेत कुणालाच मिळाले नव्हते. काही दिवसांनी शाळेतील शिक्षक पालावर त्याला शोधत आले. म्हणाले, ‘तुझ्या नावे शिक्षणमंत्र्यांचं पत्र आलंय. त्यांनी कौतुक केलंय तुझं !' बिरदेव म्हणतो, ‘त्यावेळचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी पाठवलेलं ते पत्र माझ्यासाठी काय आहे, हे मी सांगू शकत नाही! आज सगळे कौतुक करताहेत; पण इतक्या वर्षांपूर्वी दर्डा सरांनी पत्र पाठवून एका दहावीतल्या मुलाला कळवलं होतं, की तू हुशार आहेस. पुढे जाशील, मोठा होशील!’
त्या पत्राची गोष्ट सांगताना बिरदेवचा गळा दाटून येतो. मग त्याला आठवते एक बातमी. ‘९६ टक्के घेऊन दहावी झालो, तेव्हा ‘लोकमत’ने बातमी छापली होती : ‘मेंढपाळाच्या पोराला व्हायचंय कलेक्टर!’ - ते कात्रण अजून आहे माझ्याकडे!! जपून ठेवलंय!' - बिरदेव सांगतो, आणि मग काही बोलत नाही!
संधीला भिडत झडझडून मेहनत हे साधं सूत्र बिरदेवचं दुसरं नावच ‘हिंंमत’ आहे. प्लॅन ए-बी-सीचा विचार न करता समोर येईल त्या संधीला भिडून-झडझडून मेहनत करणं हे त्याचं साधं सूत्र. तिथं ना भाषेचे अडथळे आले, ना परिस्थितीचे! बिरदेव म्हणतो, ‘शेतकऱ्याच्या पोराला शेतीची आणि शेळ्या-मेंढ्यांची लाज वाटणं म्हणजे आपल्या आई-बापाची लाज वाटण्यासारखं आहे. यूपीएससीच्या मुलाखतीत मला विचारलं ना, ‘शेळीचं दूध कसं वाढवायचं' नि ‘नव्या जगात सध्या गोट मिल्कची का क्रेझ आहे’... मी दिली उत्तरं! आपण जसे आहोत तसे राहिलो की अडथळ्यांचं काही वाटत नाही!’ शाळकरी वयापासून शेळ्या-मेंढ्या वळणारा बिरू आजही शेळ्या-मेंढ्यामध्ये रमतो. त्याची कसलीही लाज वाटत नाही, असे तो म्हणतो.