आमदार अपात्रतेवर मोठी अपडेट! शिंदे गटाच्या वकिलांनी, आमदार कांदे, किशोर पाटलांनी दिली महत्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 17:09 IST2023-09-14T15:46:43+5:302023-09-14T17:09:26+5:30
शिंदे गटाच्या बाजुने अनिल साखरे आणि ठाकरे गटाच्या बाजुने कामत यांनी आज युक्तीवाद केला. जवळपास ६४ मिनिटे हा युक्तीवाद सुरु होता.

आमदार अपात्रतेवर मोठी अपडेट! शिंदे गटाच्या वकिलांनी, आमदार कांदे, किशोर पाटलांनी दिली महत्वाची माहिती
गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असलेली एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेची याचिका आज विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीसाठी घेतली आहे. परंतू, यामध्ये देखील तारीख पे तारीख पडणार असल्याचे सुतोवाच शिंदे गटाच्या वकिलांनी आणि आमदारांनी केले आहे.
शिंदे गटाच्या बाजुने अनिल साखरे आणि ठाकरे गटाच्या बाजुने कामत यांनी आज युक्तीवाद केला. जवळपास ६४ मिनिटे हा युक्तीवाद सुरु होता. साखरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, शिंदे गटाच्या बाजुने एक अर्ज केला आहे. यात सुनिल प्रभूंनी जी याचिका दाखल केली आहे, त्याची कागदपत्रे उपलब्ध करावीत अशी मागणी केली आहे. तर प्रभूंनी सर्व केसेस एकत्र सुनावणीसाठी घ्याव्यात असा अर्ज दिला आहे. यावर अध्यक्षांनी दोन्ही पक्षांना त्यांची कागदपत्रे एकमेकांना द्यावीत असे आदेश दिले आहेत.
ही कागदपत्रे एक्स्चेंज झाल्यानंतर तारीख दिली जाणार आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे. पहिली सुनावणी प्रभूंनी दाखल केली होती, असे साखरे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंच्या बाजुने कामत यांनी बाजू मांडली आहे. एका आठवड्यात लेखी म्हणणे मांडण्यास अध्यक्षांनी सांगितले आहे. १० व्या कलमावर चर्चा झाली. आता केस टू केस म्हणजेच प्रत्येक आमदार ते सुनिल प्रभू अशी २१ लोकांच्या केस सुरु असणार. हे बरेच दिवस चालेल, असे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले.
दोघांच्या वकिलांनी लेखीमध्ये म्हणणे सादर केले आहे. तब्बल ४१ याचिका होत्या. येणाऱ्या आठ दिवसांनी आणि दहा दिवसांनी अशा दोन तारखा अध्यक्षांनी दिल्या आहेत. आज इतर कोणतीही चर्चा झाली नाही, असे आमदार किशोर पाटील म्हणाले.