धक्कादायक बातमी! शिर्डीत पकडलेल्या भिक्षेकर्यापैकी चौघांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू, कुणाचा हलगर्जीपणा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:09 IST2025-04-08T17:27:40+5:302025-04-08T18:09:03+5:30
Shirdi Beggars news: जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत फक्त दोन भिक्षेकर्यांचाच मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे सांगितले असले तरी सद्यस्थितीमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

धक्कादायक बातमी! शिर्डीत पकडलेल्या भिक्षेकर्यापैकी चौघांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू, कुणाचा हलगर्जीपणा?
अहिल्यानगर : शिर्डी येथे पकडलेल्या भिक्षेकरांना विसापूर कारागृहात हलवण्यात आले होते. त्यातील १३ भिक्षेकर्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र ते पळून जात असल्याने त्यांना बांधून ठेवण्यात आले होते. यातीलच १३ पैकी चार भिक्षेकरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा रुग्णालयातून मिळाली आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी सांगितले की, दोन भिक्षेकर्यांचा मृत्यू झालेला आहे. याबाबत त्यांच्यावर काय उपचार झाले? कोणाचा हलगर्जीपणा होता? याबाबत चौकशी केली जाईल.
जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत फक्त दोन भिक्षेकर्यांचाच मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे सांगितले असले तरी सद्यस्थितीमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.
दरम्यान भिक्षेकर्यांना विसापूर कारागृहातून नगरच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर आम्हाला बांधून ठेवले. अन्न पाणी दिले नाही. उपचारही करण्यात आले नाहीत, असे तेथील काही भिक्षेकर्यांनी माध्यमांना सांगितले.
श्रीराम नवमी निमित्त शिर्डी पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेमध्ये भिक्षेकर्यांना पकडण्यात आले होते. त्यापैकी काही भिक्षेकर्यांना विसापूर येथे रवाना करण्यात आले होते. तेथीलच १३ भिक्षेकर्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते.