अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 16:46 IST2025-10-14T16:38:35+5:302025-10-14T16:46:10+5:30
Vaibhav Khedekar News: गेल्या सुमारे दीड महिन्यापासून रखडलेला वैभव खेडेकर यांचा भाजपा प्रवेश अखेर झाला.

अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
Vaibhav Khedekar News: राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोकणातील नेते वैभव खेडेकर यांना मनसेतून बडतर्फ करण्यात आले होते. वैभव खेडेकर यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश दोन ते तीन वेळा रखडला. वैभव खेडेकर शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईतही दाखल झाले होते. परंतु, वैभव खेडेकर यांच्या पक्ष प्रवेशाला मुहूर्त काही मिळाला नाही. अखेरीस आज (१४ ऑक्टोबर) वैभव खेडेकर यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला.
कोकणातील नेते वैभव खेडेकर यांच्या डोक्यावरील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृपेचा वरदहस्त दूर झाला आणि त्यांचे राजकीय ग्रहच फिरले. शक्तिप्रदर्शन करीत भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले खरे पण त्यावेळी मुहूर्त चुकला. अद्यापही त्यांना पक्षप्रवेशासाठी बोलावणे आले नाही. पक्षप्रवेशात नेमका कुणाचा अडसर आहे हे रहस्य कायम आहे. मात्र, यामुळे चलबिचल वाढल्याने त्यांनी मुंबईत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. दुसरीकडे भाजप प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह कायम असतानाच खेडचे नगराध्यक्षपद यंदा खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने स्थानिक पातळीवरही त्यांना धक्का बसला आहे. हे ग्रहमान फिरल्याचे संकेत तर नाही ना? अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली. परंतु, यानंतर आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वैभव खेडेकर यांचा भाजपामध्ये पक्ष प्रवेश पार पडला.
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला
वैभव खेडेकर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वैभव खेडेकर पक्षप्रवेश सोहळा पार पडला. वैभव खेडेकर यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही कमळ हाती घेतले. यामुळे कोकणात भाजपाची ताकद आणखी वाढल्याचे म्हटले जात आहे. वैभव खेडेकर हे गेले बरेच दिवस पक्ष प्रवेशाची वाट पाहत होते. अखेरीस भाजपा प्रवेश झाला.
दरम्यान, वैभव खेडेकर हे कोकणातील मनसेचे महत्वाचे नेते होते. खेडमध्ये मनसेचा विस्तार करण्यात वैभव खेडेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मनसेच्या स्थापनेपासून वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांच्या सोबत होते. मात्र, गेल्या काही काळापासून ते नाराज होते. वैभव खेडेकर यांचा जनसंपर्क चांगला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे खेडेकर हे आता पक्षात नसल्याने मनसेला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.