वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 19:37 IST2025-08-14T19:37:00+5:302025-08-14T19:37:35+5:30
हाय सिक्युरिटी नंबरप्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार केल्या आहेत. ही प्लेट होलोग्राम स्टिकरसह येते.

वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
मुंबई - देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट देणे बंधनकारक केले होते. त्यात अशा नंबर प्लेट जुन्या वाहनांना बसवण्यासाठी यापूर्वी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र ही पाटी बसविण्यासाठी वाहन मालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने आता HSRP प्लेट बसवण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
वाहन मालकांनी वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अपॉईंटमेंट घ्यावी. त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) न बसविणाऱ्या वाहनांवर १ डिसेंबर २०२५ नंतर वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. दिनांक ३०.११.२०२५ पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, याची सर्व संबंधित वाहन मालकांनी नोंद घ्यावी. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी वाहनावर बसविण्यात यावी असं आवाहन सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.
HSRP नंबर प्लेट कशाला हवी?
हाय सिक्युरिटी नंबरप्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार केल्या आहेत. ही प्लेट होलोग्राम स्टिकरसह येते. त्यावर इंजिन आणि चेसिस क्रमांक लिहिलेला असतो आणि हा नंबर प्रेशर मशिनद्वारे लिहिला जातो. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही. यासोबतच ही प्लेट अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. कोणीही त्याची कॉपी करून बनावट प्लेट बनवू शकत नाही. त्याची चोरी व गैरवापर करता येत नाही. एखाद्या वाहनाला अपघात झाला तर गाडीला लावलेली हाय सिक्युरिटी नंबरप्लेट वाहनाच्या मालकासह सर्व माहिती देते. एप्रिल २०१९ नंतर बाजारात येणाऱ्या सर्व वाहनांना ती अनिवार्य आहे. तसेच आता २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक करण्यात आले आहे.