मोठी बातमी! रायगड, नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती; नाराजीचे राजकारण पेटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 22:26 IST2025-01-19T22:26:12+5:302025-01-19T22:26:42+5:30
guardian ministers Politics: शनिवारी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध केली आणि रविवारी यापैकी दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नावाला स्थगितीही दिली आहे.

मोठी बातमी! रायगड, नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती; नाराजीचे राजकारण पेटले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध केली आणि रविवारी यापैकी दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नावाला स्थगितीही दिली आहे.
रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना पालकमंत्री केल्याने शिवसेनेचे भरत गोगावले नाराज झाले होते. तसेच ज्याचे जास्त आमदार त्यांचा पालकमंत्री असा निकष सांगणाऱ्या राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे आणि माझ्याबाबतीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनुकूल असे सांगणारे दादा भुसे यांना बाजुला करत भाजपाच्या गिरीष महाजन यांना पालकमंत्री करण्यात आले होते. यामुळे महायुतीत धुसफुस सुरु होती. याला आता स्थगिती देण्यात आली आहे.
यामुळे या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदासाठी उत्सुक असलेल्या गोगावले, भुसे, कोकाटे यांच्या मनात लाडू फुटू लागले आहेत. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि शिंदे सेनेचे दादा भुसे यांच्यात स्पर्धा असली तरी गिरीश महाजन यांचे नाव चर्चेत होते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर गिरीश महाजन यांना पक्षाने नाशिकपासून दूर ठेवले होते. मात्र, पक्षीय स्तरावर ते नाशिकला विविध कार्यक्रमांसाठी येतच हेाते. मात्र, राज्यात निवडणूका झाल्यानंतर अचानक नाट्यमयरीत्या छगन भुजबळ यांचे नाव मंत्रीमंडळातून वगळले गेले. अर्थात, त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पालकमंत्रीपदासाठी इच्छा प्रबळ झाली. त्यांच्यात आणि दादा भुसे यांच्यात दावे प्रतिदावे सुरू असताना कोकाटे यांनी बाहेरील जिल्ह्यातील पालकमंत्री नको असेही म्हंटले होते.