एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 11:07 IST2025-11-09T11:04:59+5:302025-11-09T11:07:05+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेचे ते तीनदा नगरसेवक झाले. स्थायी समिती सभापती म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता.

एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
मुंबई - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही धक्का दिला आहे. उद्धवसेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे हे भाजपात प्रवेश करणार आहेत. दीपेश म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यातच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दीपेश म्हात्रे भाजपात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झाले आहे.
दीपेश म्हात्रे हे ठाकरेंच्या पक्षाकडून डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार होते. त्यांच्यावर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यात निवडणुकीपूर्वी दीपेश म्हात्रे भाजपात प्रवेश करत असल्याने ठाकरेंना हा धक्का मानला जातो. दीपेश म्हात्रे यांचे वडील पुंडलिक म्हात्रे हे कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर होते. वयाच्या २३ व्या वर्षी दीपेश यांनी शिवसेनेत कामाला सुरुवात केली. रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात २०१४ आणि २०२४ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. २००९ साली पहिल्यांदाच बिनविरोध ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेचे ते तीनदा नगरसेवक झाले. स्थायी समिती सभापती म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. २०२२ पर्यंत ते शिवसेनेत कार्यरत होते, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. मात्र त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला.
काँग्रेसलाही धक्का
कल्याण डोंबिवलीत ठाकरेंसोबतच भाजपा काँग्रेसलाही धक्का देणार आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि प्रदेश सचिव संतोष केणे हेदेखील भाजपात प्रवेश करत आहेत. कल्याण ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचे मजबूत आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ते ओळखले जातात. मतदारसंघात अनेक प्रश्नांवर त्यांनी आक्रमकपणे आंदोलने केली आहेत. नवी मुंबई विमानतळाला दि.बा पाटील नाव द्यावे या मागणीसाठी त्यांनी अनेकदा आंदोलन केले आहे.
दरम्यान, सोलापूर येथे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठा झटका बसला आहे. शिंदेसेनेचे माजी सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. येत्या १२ नोव्हेंबरला मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडेल. शिवाजी सावंत हे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आहेत. शिवाजी सावंत यांच्यासोबत शिंदेसेनेचे अनेक पदाधिकारी भाजपात प्रवेश करतील असा दावा शिवाजी सावंत यांनी केला आहे.