जैन मुनींच्या अंत्यसंस्कारासाठी ११ कोटींची बोली
By Admin | Updated: September 26, 2016 13:00 IST2016-09-26T12:26:02+5:302016-09-26T13:00:09+5:30
जैन समाजातील प्रसिद्ध मुनी आचार्य श्री प्रेमसूरजीस्वाजी यांच्या अंत्यविधीसाठी रविवारी तब्बल ११ कोटी रुपयांची बोली लागली.

जैन मुनींच्या अंत्यसंस्कारासाठी ११ कोटींची बोली
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - जैन समाजातील प्रसिद्ध मुनी आचार्य श्री प्रेमसूरजीस्वाजी यांच्या अंत्यविधीसाठी रविवारी तब्बल ११ कोटी रुपयांची बोली लागली. जैन समाजातील पाच जणांनी मिळून ही बोली लावली. बोलीमधून जी रक्कम जमा होते ती धार्मिक तसेच अन्य सामाजिक उपक्रमांसाठी खर्च केली जाते. आचार्य श्री प्रेमसूरजीस्वाजी यांचे रविवारी चर्नीरोडच्या सैफी रुग्णालयात न्यूमोनिया आणि वयोमानानुसार होणा-या अन्य आजारांनी निधन झाले.
जैन समाजामध्ये मुनी आणि संतांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठी रक्कम खर्च केली जाते. रविवारच्या बोलीने या आधीचे सर्व विक्रम मोडीत निघाले. आचार्य श्री प्रेमसूरजीस्वाजी ९७ वर्षांचे होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात समाजातील हजारोंना दीक्षा दिली. प्रतिष्ठीत मुनींच्या अंत्ययात्रेत सहभागी झाल्याने पदरात पुण्य जमा होते अशी जैन समाजात मान्यता आहे.
जैन समाजात प्रसिद्ध मुनींच्या निधनानंतर पार्थिवाला अग्नि देण्यासह अन्य प्रथांसाठीही बोली लागते. श्री प्रेमसूरजीस्वाजी यांच्या अंत्यविधीसाठी रविवारी वाळकेश्वरच्या बाबू पन्नालाल जैन मंदिरात बोली लागली.
एक प्रसिद्ध डॉक्टर, बिल्डर आणि तीन जैन उद्योगपतींनी मिळून ११ कोटी ११ लाख ११हजार १११ रुपयांची रक्कम अदा केली. श्री प्रेमसूरजीस्वाजी यांच्या अंत्ययात्रेत जनसागर लोटला होता. यावेळी पार्थिवाला अग्नि देण्यासाठी ३०० किलो चंदनाची लाकडे वापरण्यात आली.
प्रत्येक जैन मुनीच्या निधानानंतर अंत्यसंस्कारासाठी बोली लावली जात नाही. स्थानिक जैनांकडून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. ज्या मुनींचे मोठया प्रमाणावर अनुयायी आहेत त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बोली लावली जाते.