मुंबई : ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ मंगळवारी सकाळी १० वाजता राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेले मंत्रिपद त्यांना दिले जात आहे. यासंदर्भातील निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) तीन नेत्यांनी घेतल्याची माहिती आहे. तर जाणून घेऊयात, पडद्यामागे नेमके काय काय घडले?
मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते होते. तेच खाते भुजबळ यांच्याकडे दिले जाईल. शपथविधी समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील. राज्यात भाजप-शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे सरकार आल्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या विस्तारावेळी भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नव्हती. तेव्हापासून ते नाराज होते. आपली नाराजी त्यांनी अनेकदा बोलून दाखविली होती. बीडमधील घटनाक्रमाच्या नंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हापासूनच भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाणार अशी चर्चा होती, ती अखेर खरी ठरली.
भुजबळ यांनी मध्यंतरी अजित पवार यांच्यावर टीकाही केली होती. मात्र नंतर चर्चा केल्यानंतर भुजबळ शांत राहिले होते. भुजबळ हे अजित पवार गटातील एक मोठा ओबीसी चेहरा मानले जातात. धनंजय मुंडे यांच्या जागी आता भुजबळ मंत्री होणार असल्याने पक्षातील इतर इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले आहे.
सात दिवसांपूर्वीच कळविला होता निर्णयउपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्यात सात दिवसांपूर्वीच भुजबळ यांना पुन्हा मंत्री करण्याबाबत चर्चा व निर्णय झाला. त्यानंतर तो भुजबळ यांना कळविण्यात आला, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.