भिवंडी : भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत भाजपने स्वकीयांच्याच बंडखोरीचा कडवट अनुभव घेतला आहे. भाजपचे तब्बल सहा नगरसेवक ऐन निवडणुकीच्या वेळी फुटल्याने भाजपच्या महापौरपदाच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांचा दारुण पराभव झाला. विशेष म्हणजे, या बंडखोर गटाने काँग्रेसप्रणीत 'सेक्युलर फ्रंट'ला उघडपणे साथ दिली.
या बंडखोरीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रभाग १८ मधील भाजपची संपूर्ण फळीच फुटली आहे. प्रभाग १८ अ मधून बिनविरोध निवडून आलेल्या अश्विनी फुटाणकर, १८ ब मधील दिपा मढवी, १८ क मधील शेख अबूशाह आणि १८ द मधील सुहास नकाते या चारही नगरसेवकांनी फुटलेल्या नारायण चौधरांनी मतदान केले. याशिवाय प्रभाग १७ अ मधील नंदीनी गायकवाड आणि स्वतः नवनिर्वाचित महापौर नारायण चौधरी यांनी बंडाचा झेंडा फडकवला.
अजब पेच: सुहास नकाते भाजपचे उमेदवार की बंडखोर?या निवडणुकीत सर्वात मोठा पेच उपमहापौर पदाबाबत पाहायला मिळाला. ज्या सुहास नकाते यांनी भाजपमधून बंडखोरी केली आणि नारायण चौधरी यांना मतदान केले, त्यांनाच भाजपने उपमहापौर पदाचा अधिकृत उमेदवार जाहीर केले होते. एका बाजूला पक्षाच्या अधिकृत महापौराला पाडायचे आणि दुसऱ्या बाजूला पक्षाचाच उपमहापौर पदाचा उमेदवार म्हणून मिरवायचे, अशा नकाते यांच्या भूमिकेमुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चांगलीच गोची झाली.
सेक्युलर फ्रंटचा 'मास्टरस्ट्रोक'भाजपमधील या अंतर्गत कलहाचा फायदा घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 'सेक्युलर फ्रंट'ने नारायण चौधरी यांना महापौरपदी बसवून भाजपला खिंडार पाडले. सहा नगरसेवकांच्या या फुटीमुळे भिवंडी भाजपमध्ये आता "कारवाईचा बडगा" उगारला जाण्याची शक्यता आहे, मात्र तोपर्यंत सत्तेची सूत्रे भाजपच्या हातातून निसटली आहेत.
Web Summary : Bhiwandi BJP faced a setback as six corporators defected during mayoral elections, backing the Congress-led front. A BJP deputy mayor candidate voted against their own mayoral candidate, causing internal conflict and a power shift to the opposition.
Web Summary : भिवंडी बीजेपी को महापौर चुनाव में झटका; छह पार्षदों ने कांग्रेस समर्थित मोर्चे का समर्थन किया। बीजेपी के उपमहापौर उम्मीदवार ने अपने ही महापौर उम्मीदवार के खिलाफ वोट किया, जिससे आंतरिक कलह और विपक्ष को सत्ता मिली।