विरोधी पक्षनेता निवड न झाल्यानं भास्कर जाधव कडाडले; "सत्तेचा माज, मस्ती डोक्यात गेलीय.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 17:13 IST2025-03-26T17:12:59+5:302025-03-26T17:13:41+5:30
प्रथा परंपरेचे रक्षण करा, नियमांप्रमाणे बोला आणि वागा हे सांगणे चुकीचे असेल तर मी हजारवेळा ती चूक करेन असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं.

विरोधी पक्षनेता निवड न झाल्यानं भास्कर जाधव कडाडले; "सत्तेचा माज, मस्ती डोक्यात गेलीय.."
मुंबई - ज्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे. ज्यांना सत्तेची मस्ती, मुजोरी आहे त्यांच्याकडून लोकशाहीची इभ्रत राखणे, त्याची शान राखणे, लोकशाहीची सभ्यता राखणे, लोकशाहीचं संवर्धन करणे ही अपेक्षा नाही असं सांगत उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव कडाडले आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची निवड न झाल्याने जाधव यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
भास्कर जाधव माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा खूप मोठा विश्वास होता. ते संसदीय कार्यप्रणालीवर काम करणारे, प्रेम करणारे आहेत. आमची संख्या कमी जास्त विचार करणार नाही असं ते सातत्याने बोलत होते. विरोधी पक्षनेतेपदाबाबत ते सूतोवाच असतील असं मला वाटत होते. परंतु या लोकांचा संसदीय कार्यप्रणाली, घटनेवर विश्वास नाही. केवळ सत्तेचा माज आणि मस्ती यांच्याकडे आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच विधानसभा अधिनियमाला जसे सदस्य बांधील आहेत तसे अध्यक्षही बांधील आहेत. अध्यक्षांनी वाट्टेल तो निर्णय घ्यायचा असं नाही. सभागृहातील प्रथा, परंपरा, नियमांप्रमाणे अध्यक्षांनी वागावे. घटनात्मक अधिकार प्रत्येकाला दिले आहेत. त्यामुळे मी कुठलीही गोष्ट चुकीची केली नाही. यांना घटनाच मान्य नाही, लोकशाही मान्य नाही. विधिमंडळ मान्य नाही असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.
दरम्यान, विरोधी पक्षनेते खुर्ची रिकामी ठेवली काय किंवा पलीकडचे सगळे सदस्य विकत घेऊन बाकीच्या खुर्च्या रिकाम्या केल्या काय..सध्या तेच सुरू आहे. संविधानावर चर्चा करताना मी सांगितले, पूर्वी गोरगरिबांना दारू, मटण देऊन मते घेतली जात होती. आता ईव्हीएममधून मते घेतली जातात. जी नावे यादीत नाही ती मते वाढवली जातात. लोकशाही मातीत घालायचं ठरवलं आहे त्यांच्याकडून फार अपेक्षा नाही. उपाध्यक्षांची निवड तुम्ही करता तुमच्या मनात असते तर विरोधी पक्षनेते निवडही केली असती. माझ्या नावाची तुम्हाला अडचण असेल, मी कायद्यावर बोट ठेवून बोलतो, प्रथा परंपरेवर बोलतो. चुकीचे काय सुरू असेल तर रोखण्याचा प्रयत्न करतो. प्रथा परंपरेचे रक्षण करा, नियमांप्रमाणे बोला आणि वागा हे सांगणे चुकीचे असेल तर मी हजारवेळा ती चूक करेन असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं.
लक्षवेधीसाठी पैसे घेतले जातात...
विधानसभेत अधिवेशन काळात लक्षवेधी लावण्यासाठी पैसे घेतले जातात. सभागृहात मी जे बोललो ते खरे आहे. विधान मंडळाचे अधिकारी मला भेटले, त्यांच्याशीही बोललो. नियमानुसार एका दिवसात ३ पेक्षा अधिक लक्षवेधी लावता येत नाहीत. फार तर विशेष बाब म्हणून एखाद दुसरी लक्षवेधी वाढवता येते परंतु सातत्याने २१, २४, २० लक्षवेधी लावल्या जातात. याबाबत का बोलायचे नाही. अध्यक्षांनी निर्णय घेतला म्हणून बोलायचे नाही, परंतु हे का? अध्यक्ष हेसुद्धा एक माणूस आहे. अध्यक्षांनी एखादा निर्णय घेतला तर त्यावर चर्चा करायची नाही असं सांगितले जाते पण हे बिल्कुल चुकीचे आहे असा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी केला.