खबरदार ‘फास्ट टॅग लेन’मध्ये घुसाल तर! नोव्हेंबरपासून दुप्पट टोल वसुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 06:10 IST2020-11-16T06:10:01+5:302020-11-16T06:10:37+5:30
Fastag Charges: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ८ याप्रमाणे १६ लेन आहेत. सर्व लेनमधून ‘फास्ट टॅग’सह अन्य पर्यायांद्वारे टोल वसुली होत होती.

खबरदार ‘फास्ट टॅग लेन’मध्ये घुसाल तर! नोव्हेंबरपासून दुप्पट टोल वसुली
राजानंद मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल नाक्यांवर राखीव असलेल्या प्रत्येकी दोन ‘फास्ट टॅग लेन’मध्ये घुसखोरी करणे वाहनचालकांना महागात पडत आहे. ‘फास्ट टॅग’ नसल्यास वाहनचालकांकडून दुप्पट टोल वसुली १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. पहिल्या आठवडाभरात सुमारे ३ हजार वाहनांकडून ७ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
देशात मागील सहा महिन्यांपासून ‘फास्ट टॅग’ या इलेक्ट्रॉनिक टोल प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला काही राष्ट्रीय महामार्गांवर टप्प्याटप्प्याने प्रायोगिक तत्वावर ‘फास्ट टॅग’ वापर सुरू झाला. आता १ जानेवारीपासून सर्व टोलनाक्यांवर ‘फास्ट टॅग’द्वारेच टोल वसुली करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. पण, प्रत्यक्षात सहा वर्षानंतर अनेक वाहनांवर ‘फास्ट टॅग’ नसल्याचे चित्र आहे.
मागील वर्षी राष्ट्रीय महामार्गांवर ‘फास्ट टॅग’ टोल वसुलीसाठी एक ते दोन लेन वगळता सर्व लेन राखीव ठेवण्यात आल्या होत्या. पण अनेक वाहनांना ‘फास्ट टॅग’ नसल्याने वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. त्यामुळे हे बंधन शिथील करण्यात आले. आता नवीन वर्षापासून याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ८ याप्रमाणे १६ लेन आहेत. सर्व लेनमधून ‘फास्ट टॅग’सह अन्य पर्यायांद्वारे टोल वसुली होत होती. पण १ नोव्हेंबरपासून प्रत्येकी दोन लेन केवळ ‘फास्ट टॅग’साठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर उर्वरीत सहा लेनमधून सर्व वाहनांना जाता येते. राखीव असलेल्या लेनमधून फास्ट टॅग नसलेली वाहने घुसल्यास त्यांच्याकडून दुप्पट टोल घेतला जात आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याबाबत पत्र दिले आहे, अशी माहिती ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर’चे प्रवक्ते विवेक देवस्थळी यांनी दिली.
देशात ‘फास्ट टॅग’ला वाढता प्रतिसाद
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माहितीनुसार, देशातील ‘फास्ट टॅग’ असलेल्या वाहनांचा आकडा २ कोटींपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत दररोजची एकूण टोलवसुली ९२ कोटींवर पोहचली आहे. मागील वर्षी हा आकडा सुमारे ७० कोटी एवढा होता. एकूण टोलवसुलीत ७५ टक्के वसुली ‘फास्ट टॅग’द्वारे होत आहे.
१० हजार वाहनांना ‘फास्ट टॅग’
n पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ‘फास्ट टॅग’ला तुलनेने कमी प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावर दररोज सुमारे ५० ते ५५ हजार वाहने ये-जा करतात.
n त्यापैकी सुमारे ३५ हजार कार आणि अन्य हलकी वाहने आहेत. त्यापैकी केवळ १० हजार वाहनांनाच ‘फास्ट टॅग’ असल्याचे विवेक देवस्थळी यांनी सांगितले.
n १ जानेवारीपासून सर्व लेन ‘फास्ट टॅग’साठी राखीव झाल्यास, दुप्पट टोल वसुली करण्याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नसल्याचेही त्यांनी सांगितले.