गिधाडांसाठी शुभसंकेत!

By Admin | Updated: March 22, 2015 00:59 IST2015-03-22T00:59:11+5:302015-03-22T00:59:11+5:30

पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारी गिधाडे दुर्मीळ होत असताना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रेस्तरॉ प्रकल्पामुळे त्यांना नवजीवन मिळाले आहे.

Best wishes for vultures! | गिधाडांसाठी शुभसंकेत!

गिधाडांसाठी शुभसंकेत!

अझहर शेख- नाशिक
पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजाविणारी गिधाडे दुर्मीळ होत असताना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रेस्तरॉ प्रकल्पामुळे त्यांना नवजीवन मिळाले आहे.
तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून २०११मध्ये वनविभाग व खोरीपाडा ग्रामस्थांच्या सहभागातून गिधाडांचे ‘रेस्तरॉ’ म्हणजेच उपाहारगृह सुरू झाले. खोरीपाडा संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प आता यशस्वी ठरला आहे. येथे गिधाडांना नियमितपणे खाद्य पुरविले जात असल्याने गिधाडांची संख्या वाढत असल्याचे वनखात्याच्या नोंदीत आढळले आहे. सुरुवातीला दोन ते पाच गिधाडे येथे येत; परंतु आता शंभराहून अधिक गिधाडे आढळत आहेत. नाशिकपासून ५५ किलोमीटरवरील खोरीपाडा या ४०० लोकसंख्या असलेल्या दुर्गम पाड्याच्या शिवारात आता शेकडो गिधाडे डोंगरमाथ्यावर दिसून येतात. डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाने मोकळ्या जागेवर संरक्षक जाळ्या लावून ‘गिधाड उपाहारगृह’ उभारले आहे. परिसरात मृत जनावरे वैद्यकीय तपासणी करून येथील मोकळ्या जागेत टाकली जातात. संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैद्य शंकर शिंदे यांनी गिधाड संवर्धनाचे महत्त्व गावकऱ्यांना पटवून दिले. गावकरीही गिधाड संवर्धन प्रकल्पासाठी पुढे आले. वनअधिकारी राजेंद्र कापसे, काशीनाथ वाघेरे यांनी हरसूल, खोरीपाडा, चिंचवड, नाकेपाडा आदी पाड्यांमध्ये प्रकल्पाविषयी जनजागृती केली. सुरुवातीला किमान वर्षभर गिधाडे अत्यंत कमी संख्येने येथे येत असत. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये गिधाडे येण्याचे प्रमाण वाढले असून, मृत जनावर टाकल्यानंतर अवघ्या दोन-तीन तासांमध्येच शेकडो गिधाडांचा थवा आकाशात घिरट्या घालताना दिसतो. वनखात्याकडून गिधाडांची दैनंदिन नोंद ठेवली जाते. एकदा दोनशे गिधाडे एकाच वेळी आल्याची नोंद झाली आहे.

अस्तित्वाचा लढा
अमेरिकेमध्ये शिसे धातूपासून बनविलेले छऱ्ये खाऊन गिधाडे मृत्युमुखी पडतात. आफ्रिकेत अन्नातील विषबाधेमुळे ते बळी ठरतात; तर दक्षिण आशियामध्ये खाद्याअभावी त्यांची उपासमार होते. भारतात जनावरांना दिल्या जाणाऱ्या वेदनाशामक औषधांमुळे गिधाडे मरत आहेत.

सुरुवातीला या प्रकल्पाबद्दल गावकऱ्यांची सकारात्मक मानसिकता नव्हती. मात्र वनविभागाचे अधिकारी व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गावकऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. खोरीपाडा गिधाड संवर्धन प्रकल्प आमचा प्रकल्प आहे, अशी भावना आदिवासी बांधवांमध्ये निर्माण झाली.
- शंकर शिंदे, अध्यक्ष, वनव्यवस्थापन समिती
खोरीपाडा येथील ‘गिधाडांचे उपाहारगृह’ हा वनविभागाचा राज्यातील पहिला प्रकल्प आहे. गिधाडांचे संवर्धन होत असून, आजूबाजूच्या डोंगरांवर त्यांची संख्या वाढली आहे. लोकसहभागातून प्रकल्प यशस्वी झाला आहे.
- अनिता पाटील, उपवनसंरक्षक, पश्चिम विभाग, नाशिक

Web Title: Best wishes for vultures!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.