‘वेस्ट’ फूडपासून ‘बेस्ट’ गॅसनिर्मिती
By Admin | Updated: November 3, 2014 03:29 IST2014-11-03T03:29:15+5:302014-11-03T03:29:15+5:30
सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि तुटवड्यावर उपाय म्हणून एका पर्यावरणप्रेमीने अत्याधुनिक मोल्डिंग बायोगॅस प्रकल्प तयार केला आहे.

‘वेस्ट’ फूडपासून ‘बेस्ट’ गॅसनिर्मिती
सचिन राऊत, अकोला
सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि तुटवड्यावर उपाय म्हणून एका पर्यावरणप्रेमीने अत्याधुनिक मोल्डिंग बायोगॅस प्रकल्प तयार केला आहे. अवघ्या चार फूट जागेत लागणारा हा प्रकल्प सुरक्षित असून, अवघ्या ५०० ते ६०० ग्रॅम शिळ्या अन्नातून
पाच जणांचा स्वयंपाक होईल, एवढी बायोगॅसनिर्मिती होऊ शकते. या प्रकल्पामुळे एका कुटुंबाची वर्षाकाठी पाच ते
सहा सिलिंडरची बचत करणे शक्य असून, अन्न फेकून देण्याच्या समस्येलाही आळा बसणार आहे. विशेष म्हणजे वेस्ट फूडपासून बेस्ट गॅसची निर्मिती करणारे असे सुमारे १२५ प्रकल्प विदर्भ व मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात कार्यान्वित झाले आहेत.
पर्यावरणप्रेमी अशोक तोष्णीवाल व गिरीश राठी यांनी मोल्डिंग बायोगॅस प्रकल्प तयार केले. पर्यावरण रक्षणासोबतच गृहिणींचे बजेटही यामुळे सांभाळले जात असल्याने दोन वर्षांत त्यांनी राज्यभरात १०० ते १२५ प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. दोन वर्षांपूर्वी लावलेले हे प्रकल्प आजही विनाखर्चाने सुरू असल्याने त्याची मागणी वाढल्याचे तोष्णीवाल सांगतात़ ५०० ते २००० लीटरच्या टाक्यांमध्ये हा प्रकल्प उपलब्ध असून, १००० लीटरच्या बायोगॅस प्रकल्पासाठी दररोज केवळ दीड किलो बायोवेस्ट किंवा तीन किलो शेणखत लागते. यातून तयार होणाऱ्या गॅसवर दिवसाला पाच लोकांच्या कुटुंबाचा स्वयंपाक तयार होतो.
एक किंवा दोन महिने त्याचा वापर नसला तरी पुन्हा सुरुवात करताना कोणतीही अडचण येत
नाही. एवढेच काय, कॉक उघडा करून आगपेटी लावली तरीही गॅसचा भडका होत नसल्याने गृहिणींसाठी हा प्रकल्प वरदान
ठरला आहे. छतावर किंवा जमिनीवर हा प्रकल्प लावता येतो.