वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं; "मी ९६ कुळी मराठा, पण.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 19:02 IST2025-01-14T19:02:26+5:302025-01-14T19:02:56+5:30
आंदोलनामुळे गुन्हा दाखल करत असाल तर आमच्या आंदोलनामुळे गुन्हा मागे घ्यावाच लागेल अशी मागणी वाल्मिक कराडच्या पत्नीने केली.

वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं; "मी ९६ कुळी मराठा, पण.."
परळी - मनोज जरांगे समाजकंटक, समाजात जो तेढ निर्माण करतोय तो समाजकंटकच असतो. त्याच्यावर गुन्हा दाखल करा. मराठा, मराठा सांगतोय, मी पण ९६ कुळी मराठा आहे. आमच्या महाराजांनी असले प्रकार शिकवले नाहीत. तुम्ही जे काही आरोप असतील ते सिद्ध करा. काल तिथे त्या माणसांना सांगतो तुझी महाराष्ट्राला गरज आहे मग आमची नाही का...याला जातीवाद कुणी शिकवला, जात बघून खून झालेत का, जात बघून गुन्हे होतात का असा घणाघात वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड समर्थकांनी ठिय्या आंदोलन केले. त्यात वाल्मिक कराडची ७५ वर्षीय आई आणि पत्नीही सहभागी झाली होती. यावेळी माध्यमाशी बोलताना वाल्मिकची पत्नी म्हणाली की, जातीवाद आणि राजकारणापायी माझ्या नवऱ्याचा हकनाक बळी दिला जातोय. हे जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील. भयानक जातीवादाचा रंग दिला जात आहे. जरांगेंने जातीवाद थांबवावा. पूर्ण मराठा समाज त्याच्या पाठीशी आहे असं त्याला वाटत असेल परंतु कुणी नाही. महाराष्ट्रात असले प्रकार पहिल्यांदा बघतोय. मूर्ख जरांगेमुळे जातीवाद वाढला असा आरोप त्यांनी केला.
त्याशिवाय आज जिल्ह्यात मराठा समाजाने आम्हाला साथ दिली आहे. ते जरांगेंला बघवत नाही. शिवाजी महाराजांनी कधीच जात बघितली नाही. लोक सांगतात म्हणून गुन्हा दाखल होत नाही. तपासल्याशिवाय गुन्हा दाखल कसे करता..मराठ्यांच्या विरोधात वंजारी समाज असा वाद केला जातोय. न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहू द्या. कालच्या आंदोलनामुळे माझ्या नवऱ्यावर गुन्हे दाखल झाले तर आमचेही आंदोलन असेच सुरू राहील. आंदोलनामुळे गुन्हा दाखल करत असाल तर आमच्या आंदोलनामुळे गुन्हा मागे घ्यावाच लागेल अशी मागणी वाल्मिक कराडच्या पत्नीने केली.
दरम्यान, आम्ही महिना झालं सहन करतोय. कशामुळे आरोप करतायेत हा प्रश्न केला नाही. जी काही न्यायव्यवस्था आहे त्यातून सत्य बाहेर येणारच आहे. खोटे गुन्हे दाखल केले तर आम्हाला मान्य नाही. आज जे आरोप करतायेत त्यांच्यासोबत अण्णांशी संबंध काय हे सगळ्यांना माहिती आहे. तपास अधिकाऱ्यांना माहिती आहे. राजकारण केले जात आहे. राजकारणासाठी माझ्या नवऱ्याचा बळी देऊ नये. आरोप करणारे कोण होते, कसे वागत होते सर्वांना माहिती आहे. वाल्मिक कराडचा वापर करून घेतला. माझ्या नवऱ्याचा वापर करून तुम्ही निवडून आला. तुमचे वरिष्ठ काही देत नसतील तर माझ्या नवऱ्याचा संबंध काय? असं सांगत वाल्मिक कराडच्या पत्नीने सुरेश धस यांच्यावरही निशाणा साधला.