गँग संपत नाही तोपर्यंत कारवाई थांबणार नाही; देशमुख कुटुंबीयांना CM फडणवीसांचा शब्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 22:04 IST2025-01-07T22:03:08+5:302025-01-07T22:04:40+5:30
आम्हाला आतापर्यंत झालेल्या तपासाचा चौकशी अहवाल २ दिवसात दिला जाईल असं सांगितले आहे असंही धनंजय देशमुख यांनी माध्यमांना सांगितले आहे.

गँग संपत नाही तोपर्यंत कारवाई थांबणार नाही; देशमुख कुटुंबीयांना CM फडणवीसांचा शब्द
मुंबई - बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आज देशमुख कुटुंबीयांनी सागर बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गँग संपत नाही तोपर्यंत कारवाई थांबणार नाही. देशमुख कुटुंब जे अधिकारी सांगतील त्यांना एसआयटीत घेऊ असा शब्द फडणवीसांनी देशमुख कुटुंबाला दिला आहे. या भेटीवेळी आमदार सुरेश धस हेदेखील उपस्थित होते.
या भेटीनंतर संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात पहिल्या दिवशी जे सांगितले तेच आज आश्वासन दिले. कुठल्याही आरोपीला सोडणार नाही. गुन्हेगाराला माफ केले जाणार नाही हे दाखवून दिले जाईल. या प्रकरणावर आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आमच्याकडे जे काही होते ते दाखवले आहे. आम्हाला न्याय हवा. न्यायाची भूमिका आम्ही मागितली आहे. हा तपास निष्पक्षपातीपणे झाला पाहिजे. या गुन्ह्यात कुणीही मोठा असला तरी त्याला शिक्षा होणार असं त्यांनी सांगितले.
तसेच आम्ही कुणाच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. मुख्यमंत्री फडणवीस हा त्यांचा निर्णय आहे. परंतु आम्हाला न्याय हवा. आम्ही एफआयआरनुसार त्यांच्याशी चर्चा केली. जी घटना घडली त्या काळातील सर्वांचे सीडीआर काढा त्यानुसार तपास करा. गेल्या ४-५ महिन्यातील FIR दिलेत. आम्हाला आतापर्यंत झालेल्या तपासाचा चौकशी अहवाल २ दिवसात दिला जाईल असं सांगितले आहे असंही धनंजय देशमुख यांनी माध्यमांना सांगितले आहे.
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड, हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचा आरोप केला जात आहे. त्यांच्यावर हत्येच्या गुन्हा दाखल करा आणि मोक्का लावा, या मागणीसह धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. परंतु वकिलाने विश्वासात न घेताच ही याचिका केल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केला. न कळवता वकिलाने स्वतःच याचिका दाखल केली, असा निर्वाळा धनंजय देशमुखांनी केला.