वाल्मिक कराडला पोलीस कोठडी, वकिलाचा संताप अनावर; बीड कोर्टाबाहेर समर्थकांचा राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 17:09 IST2025-01-15T17:08:40+5:302025-01-15T17:09:26+5:30
संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे परंतु त्याचसोबत जर कुणी दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही माफ करणार नाही अशी भूमिका कराड समर्थकांनी घेतली.

वाल्मिक कराडला पोलीस कोठडी, वकिलाचा संताप अनावर; बीड कोर्टाबाहेर समर्थकांचा राडा
बीड - वाल्मिक कराड हा माणूस नाही तर विचार आहे. मी समर्थक नाही परंतु अण्णावर प्रेम करणारा जिल्हा आहे. अण्णावर हेतूपुरस्पर आरोप केले जात आहेत. पोलीस प्रशासन इथं दादागिरी करत असेल तर आम्ही सहन करणार नाही. कोर्ट परिसरात तुम्ही घोषणाबाजी करणार असाल हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असं सांगत वाल्मिक कराड यांच्या वकिलाचा संताप अनावर झाला. वाल्मिक कराड समर्थनार्थ वकिलांसह कार्यकर्त्यांनी कोर्टाबाहेर घोषणाबाजी केली. त्यामुळे तिथं तणावाची परिस्थिती निर्माण झाली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मकोका विशेष न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून वाल्मिक कराडला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या सुनावणीनंतर वाल्मिक कराडच्या वकिलाने माध्यमांशी संवाद साधतानाच जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. मी एक वकील असून मला भारतीय संविधान भूमिका मांडण्याचा अधिकार देते. अण्णावर जे काही खोटे गुन्हे दाखल झालेत, कोर्टात अशाप्रकारे कुणी स्टंटबाजी करणार असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. कोणाला किती टक्केवारी मिळते हे आम्हाला माहिती आहे. न्यायालयाची मर्यादा आम्हाला माहिती आहे. ज्या महिलेने स्टंट केला त्यादेखील एक वकील आहेत. संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे परंतु त्याचसोबत जर कुणी दंगल घडवण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही माफ करणार नाही. स्टंटबाजी करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी कराडच्या वकिलांनी केली.
बीड कोर्टाबाहेर मोठा जमाव
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी एसआयटीने वाल्मिक कराडला अटक केली त्यानंतर बीड कोर्टात आज एसआयटीने कराडवर मकोका का लावला हे सांगण्यासाठी गुन्ह्याची यादी सादर केली. कोर्टाबाहेर काही मराठा समाजाची लोक जमले होते. त्यांनी कराडविरोधात घोषणाबाजी करतानाच वाल्मिक कराड समर्थकही जमले आणि दोन्ही गटात संघर्षाची स्थिती निर्माण होण्याआधीच पोलिसांनी दोन्ही जमावाला पांगवले. सरपंच संतोष देशमुख हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड आणि आरोपी घुले, चाटे यांच्यात १० मिनिटे फोन संभाषण झाल्याचं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितले आणि कराडला १० दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.