सुरेस धस- धनंजय मुंडे राजकीय व्हॅलेंटाईनने तर्क-वितर्क; मनाेज जरांगे-पाटील भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 05:57 IST2025-02-15T05:56:59+5:302025-02-15T05:57:49+5:30

बावनकुळेंच्या बंगल्यावर ही भेट झाली असेल तर ती किमान दहा दिवस आधी झालेली असण्याची शक्यता आहे.

Beed Sarpanch Murder Case: Suresh Dhas- Dhananjay Munde Meet Together in Chandrashekhar Bawankule house; Manoj Jarange-Patil furious | सुरेस धस- धनंजय मुंडे राजकीय व्हॅलेंटाईनने तर्क-वितर्क; मनाेज जरांगे-पाटील भडकले

सुरेस धस- धनंजय मुंडे राजकीय व्हॅलेंटाईनने तर्क-वितर्क; मनाेज जरांगे-पाटील भडकले

छत्रपती संभाजीनगर / मुंबई : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि बीड जिल्ह्यातील दहशतीवरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गेले काही दिवस सातत्याने जोरदार हल्लाबोल करणारे भाजपचे आमदार सुरेश धस हे मुंडे यांना भेटल्याचे समोर आल्याने वादळ निर्माण झाले. धस यांच्या आरोपांमुळे मुंडे यांच्या मंत्रिपदावर गदा येणार की काय, अशी परिस्थिती असताना शुक्रवारी व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत या ‘गळाभेटी’ची बातमी समोर आली. दुसरीकडे अजित पवार गटाने मुंडेंना पक्षाच्या कोअर ग्रुपमध्ये स्थान दिल्याचे जाहीर केले.

राजकीय मंचावरील हे 'तुझ्या गळा, माझ्या गळा' प्रेमाचे नाट्य पाहून सर्वसामान्य नागरिकांनी तोंडात बोटे घातली. ही भेट म्हणजे एक षड्यंत्र असल्याचे स्पष्ट दिसते, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मध्यस्थीने ही भेट झाल्याचे सूतोवाच केले. तसेच चार-साडेचार तास आम्ही तिघे एकत्र होतो, असा गौप्यस्फोट केला. आम्ही काही वेळ एकत्र होतो.  दोघांमध्ये मनभेद नाही, थोडे मतभेद आहेत, ते दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे दोघेही भेटले. मुंडे यांनी भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केले आहे. आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो, मी कोणालाही तडजोड करायला सांगितले नाही, असे बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

वक्तव्यांत विरोधाभास, खरे कोणाचे?
मुंडे आणि धस यांच्या भेटीसाठी आपण मध्यस्थी केल्याचे बावनकुळे यांनी स्वत:च सांगितले. ही भेट आपल्या घरी झाल्याचे ते म्हणाले. चार-साडेचार तास आम्ही तिघे एकत्र होतो, असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. ही भेट नेमकी कधी झाली असे विचारले असता, बावनकुळे यांनी तारीख, दिवसाचे काय करता? असा प्रतिप्रश्न केला. आ. सुरेश धस यांनी मात्र मुंडे यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्याने विचारपूस करण्यासाठी आपण मुंडे यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो, असे सांगितले.

दोघांच्या दोन दाव्यांमुळे ही भेट नेमकी कधी आणि कुठे झाली, याबाबत वेगवेगळी माहिती दिली गेली. चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्रालयासमोरील बी ५ या बंगल्यात राहतात, तर धनंजय मुंडे यांचा सातपुडा हा बंगला मलबार हिल येथे आहे. दोन बंगल्यांमध्ये सात किलोमीटरचे अंतर आहे. बावनकुळे यांनी भेटीची तारीख सांगितली नाही. मात्र, गेली आठ-दहा दिवस डोळ्याच्या ऑपरेशनमुळे धनंजय मुंडे हे आधी हॉस्पिटलमध्ये होते आणि नंतर बंगल्यावर आराम करीत आहेत. ते मंत्रिमंडळ बैठकीलाही गेलेले नव्हते. बावनकुळेंच्या बंगल्यावर ही भेट झाली असेल तर ती किमान दहा दिवस आधी झालेली असण्याची शक्यता आहे.

कोअर ग्रुपमध्ये स्थान म्हणजे पक्षाचे पाठबळ?; अजित पवारही पाठिशी?
धनंजय मुंडे यांना कोअर ग्रुपमध्ये स्थान देऊन पक्ष त्यांच्या भक्कमपणे पाठिशी असल्याचा संदेश दिला आहेच. शिवाय अजित पवारांनी त्यांना एक प्रकारे पाठबळ दिल्याचे बोलले जात आहे. या ग्रुपमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ व मुंडे यांचा समावेश आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या ग्रुपचा मुख्य उद्देश पक्षाची पुनर्बांधणी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नियोजन करणे आहे.

‘त्यांची’ भेट आमच्यासाठी धक्कादायक 
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले की, ही भेट नक्की कोणत्या कारणासाठी झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. न्याय मिळवण्यासाठी आम्ही लढत असताना काही लोक वेगळी भूमिका घेत असतील, तर ते दुर्दैवी आहे. धस यांनी अचानक मुंडे यांची भेट घेणे आमच्यासाठी धक्कादायक आहे. 

धनंजय मुंडे यांचे ऑपरेशन झाले. दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटलो. यात लपून छपून काही नाही आणि अशी विचारपूस करण्यात काय गैर आहे? त्यांच्या विरोधातील लढा आणि भेट या वेगळ्या गोष्टी आहेत. संतोष देशमुख प्रकरणासंबंधी आमचा लढा सुरूच राहील. -  आ. सुरेश धस, भाजप

अंजली दमानिया म्हणाल्या, राजकीय सेटिंग बघून किळस वाटते
या घडामोडींवर बोलताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, मला अतिशय दु:ख होत आहे. ही अशी राजकीय सेटिंग बघून किळस वाटते. उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, सुरेश धस यांनी बीडच्या जनतेचा विश्वासघात केला आहे.

संतोष देशमुखांचे कुटुंब उघड्यावर आहे आणि सुरेश धस त्यांच्या स्वार्थासाठी इकडे-तिकडे फिरत आहेत. हे शॉकिंग आहे, हा विश्वासघात आहे. हे शंभर टक्के षडयंत्र असल्याचे दिसत आहे. यांना आरोपी सोडून द्यायचे आहेत. देशमुख प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर सरकारपेक्षा धस जबाबदार राहतील. सरकारला मराठ्यांचा तिरस्कार असून, मराठ्यांच्याच हातून मराठ्यांवर वार करायचे आहेत. - मनोज जरांगे, मराठा आंदोलनाचे नेते.

Web Title: Beed Sarpanch Murder Case: Suresh Dhas- Dhananjay Munde Meet Together in Chandrashekhar Bawankule house; Manoj Jarange-Patil furious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.