मुंबई - संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वादात सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सद्सद् विवेकबुद्धीला स्मरून आणि प्रकृतीचं कारण पुढे करून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचं सांगितले. मुंडेंचा हा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यातच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पक्षाची भूमिका स्पष्ट करणारं पत्रक जारी करण्यात आलं आहे.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सहीने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. बीडसह संपूर्ण राज्यभरातील आमच्या पक्षाच्या नेत्यांनी याबाबत अत्यंत ठाम भूमिका घेतली आहे. आज धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकतेला धरून आहे. संतोष देशमुख प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरता कठोर शिक्षा व्हावी हीच आमची अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय हे प्रकरण न्यायालयीन असून तपास सुरू असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही. परंतु कोणत्याही गुन्ह्याला, गैरकृत्याला पक्षाचे किंवा आमच्या नेत्यांचे कधीही समर्थन असणार नाही. आजच्या घटनेतून हाच संदेश राज्याला गेला आहे. धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे असं तपासात समोर आलेले नाही मात्र नैतिकतेच्या मुद्द्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्वीच नैतिक मुद्द्यावर स्वत: राजीनामा देण्याचे उदाहरण निर्माण केले होते आणि या प्रकरणातही त्यांनी तशीच ठाम भूमिका घेतली होती. न्याय व्यवस्था आणि कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या कामात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही. न्यायाला विलंब होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हाच संदेश या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देत आहे असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांना दिलेल्या पत्रकात सांगितले आहे.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे असं धनंजय मुंडे यांनी सांगितले. त्यामुळे माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला असं कारण धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर केलेल्या पहिल्या ट्विटमध्ये सांगितले.