Beed woman lawyer beaten, DJ Complaint, Rohini Khadse vs Devendra Fadnavis: बीड जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून वाईट कारणांमुळे चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यामुळे एका महिला वकिलाला गावच्या सरपंचाने कार्यकर्त्यांसोबत मिळून बेदम मारहाण केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात घडली. लाठ्या काठ्या आणि पाईपच्या मदतीने ही मारहाण झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. घडलेल्या प्रकाराचे फोटोही व्हायरल झाले असून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सवाल केले आहेत.
"मुख्यमंत्री महोदय हे फोटो पहा आणि तुम्हाला झोप कशी लागते ते सांगा? डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याने त्याची तक्रार केल्याने एका महिला वकिलाला गावच्या सरपंचाने कार्यकर्त्यांसोबत मिळून बेदम मारहाण केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात घडली आहे. लाठ्या काठ्या आणि पाईपच्या मदतीने केलेल्या या महाराहाणीत महिला वकील जबर जखमी झाल्या आहेत. वकील असलेल्या महिलेला जर मारहाण होत असेल तर या राज्यात कायद्याचा धाक किती आहे हे दिसून येते. या घटनेमुळे महाराष्ट्र आता बिहारच्याही पुढे गेलाय असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे," असे ट्विट करत रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहमंत्रालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
बीडमध्ये नेमके काय घडले?
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मायग्रेनचा त्रास होत असल्याने आपल्या घरासमोरील लाऊड स्पीकर आणि पीठाची गिरण हटवण्यात यावी, अशी मागणी करत महिला वकिलाने तक्रार दाखल केली होती. त्यामुळे संतप्त झालेले गावचे सरपंच आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी महिला वकिलाला शेतामध्ये घेराव घालून अडवले. तिला लाठ्या-काठ्या आणि पाईपच्या मदतीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत जबर जखमी झालेल्या महिला वकिलाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. त्या महिला वकिलाला केलेल्या मारहाणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगान व्हायरल होत आहेत.