“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 14:31 IST2025-05-02T14:27:19+5:302025-05-02T14:31:07+5:30
Beed Sarpanch Santosh Deshmukh Case: सरकार आम्हाला कधी न्याय देईल, ते माहिती नाही. विठ्ठलाला साकडे आहे की, माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळू दे, असे सांगताना दिवंगत संतोष देशमुख यांच्या बहिणीला अश्रू अनावर झाले.

“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
Beed Sarpanch Santosh Deshmukh Case: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकामागून एक गोष्टींचा खुलासे होत आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसही न्यायालयात सुरुवात झाली आहे. सुरुवातीला राजीनाम्याची मागणी लावून धरल्यानंतर आता अंजली दमानिया, मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेकांनी धनंजय मुंडे यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. यासाठी विरोधक आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच दिवंगत संतोष देशमुख यांच्या बहिणीने न्याय मिळत नाही, तोपर्यंत चप्पल घालणार नाही, असा निर्धार बोलून दाखवला आहे.
याप्रकरणी मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह आठ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि त्यासंबंधित दोन प्रकरणांमध्ये सीआयडीने गेल्या महिन्यात बीड न्यायालयात १,२०० पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराडने बीड न्यायालयात आरोपातून मुक्तता मिळावी, यासाठी याचिका दाखल केली आहे. तसेच सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या चार हत्यारांचा परीक्षण अहवाल समोर आला आहे. या घडामोडीत संतोष देशमुख यांच्या बहिणीने पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी आपला निर्धार बोलून दाखवला.
सरकार आम्हाला कधी न्याय देईल, ते माहिती नाही
माझे नाव प्रियंका प्रताप चौधरी आहे. मी संतोष देशमुखची बहीण आहे. माझ्या भावाचा ९ डिसेंबर रोजी खून झाला. तेव्हापासून मी चप्पल सोडलेली आहे. सरकार आम्हाला कधी न्याय देईल, ते माहिती नाही. मी विठ्ठलाला साकडे घालणार आहे की, माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळू दे. माझ्या भावाने किती वेदना सहन केल्या असतील. माझ्या भावाला लवकर न्याय मिळाला, तर त्याची लेकरे थोडी-फार शिकतील, असे सांगताना प्रियंका चौधरी यांना अश्रु अनावर झाले.
दरम्यान, मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या पवनचक्कीच्या वादातून झाल्याचे सांगितले. पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोपपत्रात देखील हा उल्लेख आहे. या हत्येचे पडसाद राज्यभरात उमटल्याचे दिसून आले.