Jitendra Awhad News: बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे येथील गुन्हेगारीच्या घटना उजेडात येत असून, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे की, "संपूर्ण हिंसक मार्गाने हत्यारे, गुंड आणि ताकतीच्या जोरावर पूर्णपणे बूथ कॅपच्यर. विरोधक उमेदवाराला दमदाटी, मारहाण. उमेदवाराच्या अंगरक्षक पोलिसालाही दमदाटी आणि धमकी. मतदारांना मतदान करताना अडकाठी व मारहाण. विरोधक उमेदवाराच्या समर्थकांना मारहाण, मतदान कोणी करायचे आणि कोणी नाही करायचे हेच ठरवणार. विरोधी उमेदवाराला मतदान करेल, असा थोडासा जरी संशय आला तरी मतदाराला मारहाण करून हाकालपट्टी."
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणतात, "अशा निवडणुका तर पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा दक्षिण कोरियामध्ये सुद्धा होत नसतील. #परळी. बूथ ताब्यात घेण्याचा अजून एक पुरावा."
व्हिडीओत दिसणारा मुलगा कोण?
जितेंद्र आव्हडा यांनी विधानसभा निवडणुकीतील मतदानावेळी एका मतदान केंद्राबाहेरील व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात निखिल आणि कैलास फड हे धनंजय मुंडे समर्थक लोकांना रोखताना दिसत आहेत.
निखिल आणि कैलास फड यांचे हवेत गोळीबार करतानाचे, कमरेला पिस्तुल लावलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांचे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासोबतचे व्हिडीओही संतोष देशमुख हत्याकांड आणि बीडमधील गुन्हेगारीचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर व्हायरल झाले होते. त्यात जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या व्हिडीओचाही समावेश आहे.