गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 10:25 IST2025-10-03T10:24:29+5:302025-10-03T10:25:39+5:30
परतीच्या पावसाचा कृषी उत्पादनावर माेठा परिणाम

गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात मटार २०० ते २२० व गवार १८० ते २०० रुपये किलो दराने विकली जात आहे. पालक जुडीचा भाव ६० रुपये, तर मेथी ५० रुपये झाली आहे.
परतीच्या पावसाने तडाखा दिल्याने कृषी उत्पादनावर माेठा परिणाम झाला आहे. भाजीपाल्याचेही प्रचंड नुकसान झाले असून, मुंबईत आवक घटली आहे. दसऱ्या दिवशी गुरुवारी ४६६ वाहनांमधून १५०० टन भाजीपाल्यांची आवक झाली. मागणीच्या तुलनेमध्ये जवळपास १ हजार टन कमी आवक झाली आहे. आलेल्या भाजीपाल्यांमध्ये खराब मालाचे प्रमाणही १० ते १५ टक्के आहे. त्याचा परिणाम बाजारभावावर झाला आहे. पितृपंधरवड्यामध्ये मागणी वाढूनही दर नियंत्रणात राहिले होते. गणेशोत्सवातही दर नियंत्रणात होते; परंतु नवरात्रीच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम बाजारभावावर झाला आहे.
हिरवा मटार घाऊक बाजारात १०० ते १४० रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारात हेच दर २०० ते २२० रुपयांवर आहेत. गवारचे दरही तेजीत आहेत. घाऊकमध्ये ६० ते ९० व किरकोळमध्ये १८० ते २०० रुपये किलो दराने गवार विकली जात आहे. ढोबळी, फरसबी, घेवडा, शेवगा शेंग, तोंडली या भाज्यांनीही शंभरी ओलांडली आहे.
भाजीपाल्याचे घाऊक व किरकोळ बाजारातील दर
भाजी घाऊक किरकोळ
गवार ६० ते ९० १८० ते २००
मटार १०० ते १४० २०० ते २२०
भेंडी ३६ ते ५० १०० ते १२०
दुधी भोपळा २२ ते २८ ८०
फरसबी ३० ते ४० १००
घेवडा ३० ते ४० १००
कारली १६ ते २० ८०
ढोबळी मिरची २६ ते ३६ १००
शेवगा शेंगा ६० ते ९० १०० ते१६०
दोडका २६ ते ४० १००
तोंडली ४० ते ५० १०० ते १२०
वांगी ३४ ते ४० ८० ते १००
टोमॅटो १२ ते २४ ५०
पालेभाज्या प्रतिजुडी दर
वस्तू घाऊक किरकोळ
पालक १५ ते १६ ५० ते ६०
मेथी १८ ते २० ४० ते ५०
कोथिंबीर ८ ते १२ ३५ ते ४०
शेपू १० ते १२ ४०
कांदापात १४ ते १५ ३०
केवळ टोमॅटो स्वस्त
सद्य:स्थितीमध्ये केवळ टोमॅटोचे दर नियंत्रणात आहेत. होलसेल मार्केटमध्ये टोमॅटो १२ ते २४ रुपये व किरकोळ मार्केटमध्ये ५० रुपये किलोदराने विकला जात आहे. इतर सर्व भाज्यांचे दर वाढू लागले आहेत.