मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
By Atul.jaiswal | Updated: September 23, 2024 13:40 IST2024-09-23T13:39:07+5:302024-09-23T13:40:31+5:30
अवकाशातील अप्रतीम खगोलिय नजारा, आकाशातील एक अप्रतिम नजारा म्हणून आपण धुमकेतूची वाट पाहतो. १९८६ मध्ये आलेला हॅलेचा धुमकेतू अनेकांच्या स्मरणात असेल.

मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
अकोला : आपल्या सूर्यकुलाचे घटक असलेले धुमकेतू अती लंबवर्तुळाकार भ्रमण कक्षेत जेव्हा पृथ्वी व सूर्याजवळ येतात तेव्हा त्यांचे विलोभनीय दर्शन घडते. सध्या स्थितीत असाच एक नवा धुमकेतू त्सूचिन्शान एटलास २७ सप्टेंबरपासून पृथ्वीच्या जवळ येत आहे. आकाशात दिसणारा हा धुमकेतू त्सूचिन्शान एटलास किंवा C2023 A3 या नावाचा असुन, त्याचा शोध ९ जानेवारी २०२३ रोजी पर्पल माउंटन वेधशाळेने लावला.
आकाशातील एक अप्रतिम नजारा म्हणून आपण धुमकेतूची वाट पाहतो. १९८६ मध्ये आलेला हॅलेचा धुमकेतू अनेकांच्या स्मरणात असेल. हाच जेंव्हा १९१० साली आला तेव्हा दिवसा सुद्धा दिसायचा. सूर्यमालेच्या बाहेर ऊर्ट क्लाऊडच्या पट्ट्यातून सूर्याभोवती फिरणारे हे धुमकेतू जेव्हा पृथ्वी आणि सूर्याजवळ येतात तेव्हा त्यांच्यात असलेल्या खडक,धूळ, बर्फ व वायूंच्या मिश्रणाच्या अनियमित गोळ्यातील घटकांचे रुपांतर सूर्यप्रकाश व उष्णतेने लांबलचक शेपटीत होते. यालाच काही लोक शेंडे नक्षत्र म्हणून ओळखतात.
दर्शन योग्य कालावधी
येत्या २७ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत हा आकाश पाहूणा सूर्य आणि पृथ्वी जवळ येत असल्याने त्याचे तेज वाढणार आहे. हा अनोखा नजारा सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यात सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर सिंह राशी जवळ आणि ऑक्टोबरच्या मध्यात सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात शूक्र ग्रहाजवळ बघता येईल.
लक्षावधी किलोमीटर दूर असलेल्या या नव्या अवकाश पाहूण्याच्या दर्शनाचा दूर्लभ योग हजारो वर्षांनंतर जुळून येत आहे. या अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद अवश्य घ्यायलाच हवा.
- प्रभाकर दोड, ज्येष्ठ खगोल अभ्यासक, अकोला