प्रकृतीच्या प्रकोपाला तयार रहा! उत्तरेकडे पाऊस, तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटा; या तारखेपासून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 10:23 IST2025-03-11T08:52:01+5:302025-03-11T10:23:17+5:30
Heat Wave in Maharashtra: आज अचानक पुण्यात सकाळच्या वेळी असलेले थंड वातावरण गरम जाणवू लागले आहे. तसेच येता आठवडा महाराष्ट्रासाठी तापदायक ठरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

प्रकृतीच्या प्रकोपाला तयार रहा! उत्तरेकडे पाऊस, तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटा; या तारखेपासून...
होळी आली, मार्च महिना सुरु झाला तरी काही ठिकाणी रात्रीची थंडी आणि दिवसाची उष्णता असा कडाका सुरु होता. कोकणात तर धुक्याची चादर काही केल्या हटत नाहीय. परंतू, आज अचानक पुण्यात सकाळच्या वेळी असलेले थंड वातावरण गरम जाणवू लागले आहे. तसेच येता आठवडा महाराष्ट्रासाठी तापदायक ठरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
एकंदरीच प्रकृतीच्या प्रकोपाला सामोरे जाण्याची ताकद ठेवावी लागणार आहे. उत्तर भारतात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. १० ते १२ मार्च या काळात हवामानात मोठा बदल होणार आहे. पश्चिम इराण आणि आसपासच्या भागात खालच्या ते वरच्या पातळीवर चक्राकार अभिसरण म्हणून एक नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाला आहे. त्याचा परिणाम भारतावर होत आहे.
येत्या आठवड्यात गुजरात, कोकण, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागांत उष्णतेच्या लाटा येणार आहेत. ११ ते १५ मार्च दरम्यान हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात वादळ, बर्फवृष्टी आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये १५ मार्चपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील चार दिवसांत वायव्य भारतातील मैदानी भागात कमाल तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा येथे विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात काय?
११ ते १४ मार्च दरम्यान गुजरात, कोकण, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेच्या लाटा उसळणार आहेत. मध्य भारत आणि महाराष्ट्रात कमाल तापमानात हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सिअसने आणि पूर्व भारतात तीन ते पाच अंश सेल्सिअसने वाढ होण्याची अपेक्षा आहे. या काळात सुती कपडे घालावेत, मुलांनी उन्हात जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.