काळजी घ्या! उष्णतेची लाट येतेय; हवामान खात्याचा नागरिकांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 07:14 IST2020-05-06T03:00:42+5:302020-05-06T07:14:00+5:30

कमाल तापमानाचा पारा ४१ ते ४४ अंश सेल्सिअसवर

Be careful! The heat wave is coming; Meteorological Department warns citizens | काळजी घ्या! उष्णतेची लाट येतेय; हवामान खात्याचा नागरिकांना इशारा

काळजी घ्या! उष्णतेची लाट येतेय; हवामान खात्याचा नागरिकांना इशारा

मुंबई : मे महिन्यात मुंबईसह राज्याचा पारा चांगलाच वाढत असून, बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. मराठवाडा आणि विदर्भात अनेक शहरांचे कमाल तापमान ४० अंशांवर नोंदविण्यात येत असून, आता मध्य भारतात उष्णतेची लाट येईल, असा इशारा देण्यात आला असून, ६ मे रोजी विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झालीे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. ६ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ७ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार वारे वाहतील. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. ८ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. ९ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार वाºयासह पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

६ आणि ७ मे रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २६ अंशांच्या आसपास राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली.

हवामानात उल्लेखनीय बदल
येत्या काही दिवसांत हवामानात उल्लेखनीय बदल होतील. मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील बहुतांश शहरांत २ ते ४ दिवस कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येईल. परिणामी उष्णतेच्या लाटा वाहतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.

तापलेली शहरे
(तापमान अंश सेल्सिअसमध्ये)

जळगाव ४३.५
मालेगाव ४३.२
सोलापूर ४२.७
उस्मानाबाद ४१.६
औरंगाबाद ४१.५
परभणी ४४.0
नांदेड ४३.५
बीड ४३.३
अकोला ४४.९
अमरावती ४४.४
बुलडाणा ४१.६
चंद्रपूर ४४.0
गोंदिया ४३.४
नागपूर ४४.८
वर्धा ४४.५

Web Title: Be careful! The heat wave is coming; Meteorological Department warns citizens