‘बाजार’अमावास्येचा
By Admin | Updated: January 20, 2015 23:48 IST2015-01-20T23:29:30+5:302015-01-20T23:48:30+5:30
अंधश्रद्धेला खतपाणी : सुशिक्षितांनीही पांघरला अज्ञानाचा बुरखा

‘बाजार’अमावास्येचा
संदीप खवळे - कोल्हापूर -पुरोगामी मानल्या जाणाऱ्या कोल्हापुरात अमावास्येला अपशकून मानणारे मोठ्या संख्येने आहेत. आज, मंगळवारी झालेल्या अमावास्येला तथाकथित वाईट शक्तीला दूर ठेवण्यासाठी अंधश्रद्धेच्या आहारी जात सुमारे पाऊण लाख कुटुंबांनी लिंबू-मिरची-बिब्याची माळ दारावर लटकविली़ काहींनी ‘परंपरेचा भाग’ म्हणूनही याला आंधळेपणाने स्वीकारले. चहा विके्रत्यांपासून ते सराफ व्यावसायिकांपर्यंत आणि जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती, शासकीय अधिकारी ते स्वत:ला सुशिक्षित म्हणणाऱ्यांच्या गाड्यांना लिंबू-मिरची आणि बिब्याचे ‘संरक्षक कवच’ दिसले़ अमावास्येमुळे नारळ, उदबत्ती, कापूर आणि लिंबू, बिब्बा, मिरच्या यांच्यासाठी शहरवासीयांच्या खिशाला सुमारे पंधरा लाखांवर कात्रीही लागली.काही सराफ व्यावसायिकांनी पेढीची पूजाअर्चा करून दुपारनंतर काढता पाय घेतला़ खरेदीचे व्यवहार होत नसल्यामुळे तीस टक्के दुकानांना कुलूप होते. तर काही रिक्षाचालकांनीसुद्धा रिक्षा घरीच लावणे पंसत केले.
निसर्गचक्राचा एक भाग असलेल्या या अमावास्येनिमित्त ‘लोकमत’ने नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता, अमावास्येचे भय अनेकांच्या मनात आजही असल्याचे दिसले़ परंपरेचा भाग, वाईट शक्तींचा प्रभाव टाळण्यासाठी अमावास्या पाळत असल्याचे त्यांनी दबक्या आवाजात सांगितले़. पुरोगामी कार्यकर्त्यांनी मात्र अमावास्येला निसर्गचक्रातील घटना यापलीकडे महत्त्व देत नसल्याचे रोखठोक मांडले़ अमावास्येबाबत या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया़़़
लिंबू-मिरची उलाढाल
अमावास्येच्या दिवशी एरवीपेक्षा लिंबू-मिरचीची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते़ आज, मंगळवारी लिंबू-मिरची आणि बिब्ब्यांची माळ शहरात ठिकठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात येते़ लिंबूबरोबरच नारळ, अगरबत्तीही ठेवण्यात आली होती़ नारळाची सरासरी किंमत दहा, तर मिरच्या, लिंबू व बिब्ब्यांची जुडी पाच रुपयांना होती. सोबत पाच रुपयांची अगरबत्ती़ महापालिकेकडे सुमारे एक लाख तीस हजार मिळकतींची नोंद आहे. यातील निम्म्याजणांनी खरेदी केल्याचे गृहीत धरले, तर हा आकडा तेरा लाखांच्या आसपास जातो़ याशिवाय शहरातील वाहनधारकांनी केलेली खरेदी वेगळीच ़़.
लोकप्रतिनिधीही
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापतींच्या गाडीलाही लिंबू, मिरच्या व बिब्बा दिसला. अंधश्रद्धेविरोधात कायदा झाला, तरी लोकप्रतिनिधींची मानसिकता बदलली नाही. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी कशी होणार हा प्रश्नच आहे.
नेहमीपेक्षा अमावास्येदिवशी सर्व्हिसिंगसाठी गाड्यांची गर्दी जास्त असते़ शिक्षित, निमशिक्षित, तसेच युवकही या दिवशी गाड्या सर्व्हिसिंगसाठी घेऊन येतात; पण गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण काहीसे कमी झाले आहे.
- व्यवस्थापक, शेतकरी बाजार सर्व्हिसिंग सेंटर
अमावास्या आणि पौर्णिमेला नागरिक खरेदी करीत नाहीत़ त्यामुळे या दिवशी दुकान बंदच ठेवतो़ गुजरीतील सुमारे वीस टक्के सराफ दुकाने बंद असतात
- धैर्यशील माने, मे़ माने ब्रदर्स
अमावास्येदिवशी संध्याकाळी नारळ फोडतो़ गाडीची स्वच्छता करण्याबरोबरच लिंबू-मिरची लावणे, पूजा करणे या गोष्टी पाळतो़ करणीवर विश्वास नाही; पण मनशांतीचा भाग म्हणून हा विधी पार पाडतो.
- शंकर गावडे, चहा विक्रेते
अमावास्या आणि पौर्णिमेला नागरिक खरेदी करीत नाहीत़ त्यामुळे या दिवशी दुकान बंदच ठेवतो़ गुजरीतील सुमारे वीस टक्के सराफ दुकाने बंद असतात
- धैर्यशील माने, मे़ माने ब्रदर्स
अमावास्या, पौर्णिमा याला निसर्गचक्र ाचा एक भाग या पलीकडे या गोष्टींना फारसे महत्त्व नाही़ मुलांवरही असेच संस्कार केले आहेत़ अमावास्येदिवशी अनेक चांगली कामे सुरू केली़ ही सर्व कामे यशस्वी झाली़
- माणिक यादव, शिक्षक
अमावास्या निसर्ग चक्राचा भाग
विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन नसलेली माणसे यांचा संबंध अशास्त्रीय पद्धतीने लावून कर्मकांडाचे स्तोम माजवत असतात. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते, तर चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो़ चंद्राला स्वत:चा प्रकाश नाही़ पृथ्वीची सूर्याभोवती आणि चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा वेगवेगळ्या पातळीत आहे़ या पातळी एकमेकांना पाच अंशांचा कोन करतात़ त्यामुळे जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांमध्ये चंद्र येतो, तेव्हा तो पाच अंशांनी वर असतो. अशावेळी सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो व चंद्रावरून परावर्तित झालेला प्रकाश पृथ्वीच्या अंधार पडलेल्या भागात पोहोचत नाही़ परिणामी आकाश काळेकुट्ट होते. यालाच आपण अमावास्या म्हणतो, असे खगोलशास्त्र अभ्यासक डॉ. नितीन शिंदे यांनी सांगितले.
परंपरेचा भाग म्हणून अनेक नारळ वाढवितो़ लिंबू-मिरच्या व बिब्यांची जुडी रिक्षाला बांधतो़ परंपरेचा भाग म्हणून या विधी करतो़ काही रिक्षावाले अमावास्येदिवशी रिक्षाच बाहेर काढत नाहीत किंवा रिक्षाची दुरुस्ती करीत नाहीत.
- सुनील चव्हाण, रिक्षाचालक
अमावास्येदिवशी उतारा टाकण्याची किंवा लिंबू अन् गंडेदोरे बांधण्याची सक्ती एखादी व्यक्ती करीत असल्यास किंवा तसा प्रसार करीत असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीवर जादूटोणाविरोधी कायद्यातील तरतुदीनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच तीन ते सात वर्षांपर्यंत शिक्षेची आणि पाच ते ५० हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.
- अविनाश पाटील, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कार्यकारिणी अध्यक्ष.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असल्यामुळे अमावास्या आणि पौर्णिमेदिवशी नागरिक चांगल्या कार्याची सुरुवात करीत नाहीत़ अमावास्येदिवशी एखादे मूल जन्माला आले, तर त्याला आपण टाकून देतो का़़.? इतिहासातील अनेक लढाया अमावास्येदिवशीच सुरू झालेल्या आहेत़ विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचा प्रसार वाढला पाहिजे.
- वसंत मुळीक, जिल्हाध्यक्ष, मराठा महासंघ