गुजरातमधून महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा येतोय; तलासरीत दोन लाखांचा गुटखा पकडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 07:01 IST2023-09-03T07:01:42+5:302023-09-03T07:01:56+5:30
महाराष्ट्रात गुटखा बंदी असून, गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची वाहतूक होते.

गुजरातमधून महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा येतोय; तलासरीत दोन लाखांचा गुटखा पकडला
तलासरी : गुजरात राज्यातून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच तलासरी पोलिसांनी शुक्रवारी पाळत ठेवून कारवाई केली.
आमगाव येथे अवैधपणे गुटखा घेऊन येणारा लाल रंगाचा टेम्पो अडवून तपासणी केली असता टेम्पोत २ लाख १३ हजार ६८० रुपयांचा गुटखा आढळून आला. यावेळी अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन इसमांसह १२ लाख १३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद शाहरुख जमीरूल हक (वय २७, रा. उत्तर प्रदेश), जगदीश मंगीलाल गुजर (वय ३३, रा. चेंबूर, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात गुटखा बंदी असून, गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची वाहतूक होते. दररोज अवैध गुटख्याची वाहतूक करणारे शेकडो ट्रक महाराष्ट्र राज्यात प्रवेश करतात, पण कारवाई मात्र नगण्य होत असते. त्यामुळे या गुटख्यांच्या अवैध वाहतुकीला आशीर्वाद कोणाचा, हा प्रश्न विचारला जात आहे.