पुणे : बँक आॅफ महाराष्ट्राने ८४ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यात ७५ कॅश रिसायकलर्स सुरु केले आहेत. त्यामुळे एटीएम केंद्रामधून पैसे काढण्याबरोबरच पैसे भरण्याची सुविधा देखील मिळणार असल्याची माहिती बँक व्यवस्थापनाकडून देण्यात आली. एटीएममध्ये सध्या पैसे काढणे, पिन नंबर बदलणे, रक्कम इतर खात्यात वर्ग करणे या सुविधांबरोबर एटीएमकार्डसह अथवा कार्डविना देखील २ हजार, पाचशे, दोनशे, शंभर आणि ५० रुपांच्या २०० नोटा एकाचवेळी जमा करता येणार आहेत. याबाबत माहिती देताना बँकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत म्हणाले, १९३५ साली स्थापन झालेल्या बँकेच्या देशभरात १ हजार ८४६ शाखा, १ हजार ८ ७४ एटीएम, २ कोटी ६० लाख ग्राहक आणि १३ हजार कर्मचारी आहेत. बँकेची सेवा अधिकाधिक ग्राहकाभिमुख करण्यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. एम. व्ही. पटवर्धन म्हणाले, देशाच्या विकासात बँक आॅफ महाराष्ट्रचा सहभाग उल्लेखनीय आहे. नव्या बँकिंग संरचनेतील स्थित्यंतर आणि नव्याने आलेले नियम यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ताळेबंदात वेगाने परिवर्तन होत आहे. देश वेगाने वाढणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग होत असल्याने भारतीय बँकिंग व्यवस्थाही वेगाने वाढत आहे.डॉ. पटवर्धन यांच्या हस्ते दहावी आणि बारावीतील परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना महा-मेधावी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएममधून पैसे भरता येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 19:34 IST
बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएम केंद्रामधून पैसे काढण्याबरोबरच पैसे भरण्याची सुविधा देखील मिळणार
बँक आॅफ महाराष्ट्रच्या एटीएममधून पैसे भरता येणार
ठळक मुद्दे२ हजार, पाचशे, दोनशे, शंभर आणि ५० रुपांच्या २०० नोटा एकाचवेळी जमा करता येणार १९३५ साली स्थापन झालेल्या बँकेच्या देशभरात १ हजार ८४६ शाखा, १ हजार ८७४ एटीएम