वक्फ विधेयकाच्या मतदानावेळी बाळ्या मामा गैरहजर? उलट सुलट चर्चांवर म्हात्रेंचे स्पष्टीकरण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 20:39 IST2025-04-05T20:39:23+5:302025-04-05T20:39:54+5:30
सत्ताधारी राष्ट्रवादीशी जवळीक असल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहेत. यावरून बाळ्या मामा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

वक्फ विधेयकाच्या मतदानावेळी बाळ्या मामा गैरहजर? उलट सुलट चर्चांवर म्हात्रेंचे स्पष्टीकरण...
वक्फ सुधारणा विधेयकावेळी शरद पवार गटाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे लोकसभेत अनुपस्थित होते. यावरून उलट सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. सत्ताधारी राष्ट्रवादीशी जवळीक असल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहेत. यावरून बाळ्या मामा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
आपली तब्येत बरी नसल्याने वक्फ विधेयकाच्या मतदानावेळी मी उपस्थित राहू शकलो नाही, असे म्हात्रेंनी म्हटले आहे. माझी बदनामी करून विरोधक दोन गटात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका, असे म्हात्रे म्हणाले.
वक्फ बिलावरील जेपीसीच्या प्रत्येक बैठकीला मी हजर होतो. तेव्हा मी पक्षाच्या भूमिकेप्रमाणे या विधेयकाला विरोध केला होता. तब्येत बरी नसल्याने मी फक्त एका मिटींगला गेलो नव्हतो. आताही मतदानावेळी मी यामुळेच गैरहजर होतो, असे म्हात्रे यांनी सांगितले.
माझ्या लोकसभा मतदारसंघातील कामांसाठी सत्ताधारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटावे लागते. परंतू काही विरोधक माझ्याविरोधात काहीतरी पेरून नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. माझ्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे, त्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिलेली आहे. त्याची चौकशीही सुरु आहेत .वक्फ विधेयकाविरोधात आम्ही अनेकदा आवाज उठविलेला आहे. आजही आमची तीच भूमिका आहे, असे म्हात्रे म्हणाले.