"उल्हासनगर येथे अल्पवयीन पीडितांच्या घरासमोर दहशत पसरवणाऱ्या आरोपींचा जामीन रद्द करण्यात यावा", नीलम गोऱ्हे यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 22:23 IST2025-07-22T22:23:40+5:302025-07-22T22:23:57+5:30
Neelam Gorhe News: उल्हासनगर (रमाबाई टेकडी) येथे अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणातील आरोपींपैकी रोहित झा हा जामिनावर सुटून आल्यावर पीडित मुलींच्या घरासमोर ढोल-ताशे, फटाके वाजवत मिरवणूक काढत असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

"उल्हासनगर येथे अल्पवयीन पीडितांच्या घरासमोर दहशत पसरवणाऱ्या आरोपींचा जामीन रद्द करण्यात यावा", नीलम गोऱ्हे यांची मागणी
मुंबई - उल्हासनगर (रमाबाई टेकडी) येथे अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणातील आरोपींपैकी रोहित झा हा जामिनावर सुटून आल्यावर पीडित मुलींच्या घरासमोर ढोल-ताशे, फटाके वाजवत मिरवणूक काढत असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालकांना कठोर कारवाई करत आरोपीचा जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे.
आरोपीने जामिनाच्या अटींचे उघड उल्लंघन केल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली झाली असून, हा कायद्यावरील विश्वास डळमळीत करणारा प्रकार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “उल्हासनगर येथे तीन दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्यानंतर त्यातील आरोपी रोहित झा याला जामीन मिळाला आणि तो जामिनावर सुटल्यावर वाजतगाजत मिरवणूक काढून पीडित मुलींना धमकावण्याचा प्रयत्न करतो, ही अतिशय निंदास्पद व हीन प्रवृत्ती आहे. गुन्हा करून सुटल्यानंतर पीडितांना मानसिक त्रास देणे हे अजिबात सहन केले जाणार नाही. यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “मी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे व सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याशी या प्रकरणी चर्चा केली असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे. पीडित मुलींना पुन्हा धमकावले जाणार नाही, यासाठी पोलिसांनी काही संरक्षणात्मक उपाययोजना देखील हाती घेतल्या आहेत. तसेच, पीडित मुलींना समुपदेशन देऊन त्यांचा धीर वाढवणे आवश्यक आहे.”
डॉ. गोऱ्हे यांनी पुढे मागणी केली आहे की, या घटनेच्या आधारे न्यायालयात सविस्तर अहवाल सादर करून आरोपी रोहित झा याचा जामीन रद्द करण्यासाठी तातडीने प्रस्ताव दाखल करावा. तसेच, जामिनाच्या अटींचे उल्लंघन व न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा आणल्याबद्दल नवीन गुन्हा दाखल करून आरोपीला त्वरित ताब्यात घ्यावे.
तसेच, आरोपीच्या मिरवणुकीत सहभागी सर्व व्यक्तींवर कारवाई करून या प्रकरणाचा तपास विशेष पथकाद्वारे करावा, पीडित कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण पुरवावे व परिसरात अशा प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त स्तरावर सतत आढावा घेतला जावा, अशी मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
शेवटी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “अल्पवयीन मुलींवर विनयभंगासारखे गुन्हे आणि त्यानंतर पीडितांना धमकावण्याच्या घटना थांबवण्यासाठी पाॅक्सो कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व समाजातील अशा प्रवृत्तीवर वेळेवर प्रतिबंधात्मक कारवाई होणे गरजेचे आहे.”