बदलापूर पश्चिम भागातील एका नामांकित खासगी शाळेत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शाळेच्या बसमध्ये एका ४ वर्षांच्या चिमुकलीवर बसचालकाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून खबरदारीचा उपाय म्हणून बदलापूर रेल्वे स्थानकावर दंगल नियंत्रण पथक आणि आरपीएफचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नर्सरीत शिकणारी ही चिमुकली गुरुवारी दुपारी शाळेतून घरी परतत होती. रोज दुपारी १:३० वाजता घरी पोहोचणारी बस गुरुवारी पाऊण तास उशिराने आली. मुलीच्या आईने चालकाला फोन केला असता, त्याने इतर मुलांना सोडायचे असल्याचे कारण दिले. मात्र, मुलगी बसमधून उतरल्यावर रडत होती. आईने विचारपूस केली असता, तिने घडलेला अमानुष प्रकार सांगितला.
मुलीच्या पालकांनी तातडीने शाळा प्रशासनाकडे धाव घेऊन मुख्याध्यापिकांना घडलेला प्रकार सांगितला. पीडित मुलीने स्वतः मुख्याध्यापिकेसमोर आपबिती सांगितले. मात्र, मुख्याध्यापिकेने गांभीर्य दाखवण्याऐवजी उलट आरोपी बसचालकाचीच बाजू घेतल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. जेव्हा आरोपी चालकाला मुलीसमोर आणले गेले, तेव्हा ती प्रचंड घाबरली आणि पालकांच्या मागे लपली. शाळेच्या या वागणुकीमुळे संतापलेल्या पालकांनी अखेर पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
पालकांच्या तक्रारीनंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी बसचालकाला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. बदलापुरात काही महिन्यांपूर्वीच अशीच एक घटना घडली होती, ज्यानंतर नागरिकांनी ९ तास रेल्वे रोको केला होता. पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होऊ नये आणि नागरिकांमध्ये संभ्रम पसरू नये, यासाठी पोलिसांनी शहरात आणि रेल्वे स्थानक परिसरात कडेकोट बंदोबस्त लावला आहे. शिवाय, रेल्वे स्थानकावर दंगल नियंत्रण पथक आणि आरपीएफ जवानही तैनात आहेत.
Web Summary : Following a sexual assault on a 4-year-old in a school bus, Badlapur railway station is under heavy security. Police arrested the driver after parents reported the incident, alleging school negligence. Riot control and RPF personnel are deployed to prevent unrest.
Web Summary : स्कूल बस में 4 वर्षीय बच्ची के साथ यौन उत्पीड़न के बाद बदलापुर रेलवे स्टेशन पर सुरक्षा कड़ी कर दी गई है। पुलिस ने माता-पिता की शिकायत पर ड्राइवर को गिरफ्तार किया, जिन्होंने स्कूल पर लापरवाही का आरोप लगाया है। दंगा नियंत्रण और आरपीएफ कर्मी तैनात हैं।