शिवसेनेच्या आंदोलनानंतरही निकृष्ट साहित्य
By Admin | Updated: January 21, 2017 03:24 IST2017-01-21T03:24:56+5:302017-01-21T03:24:56+5:30
शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची करायची असल्याचे कारण देवून पालकांकडून शैक्षणिक साहित्यासाठी पैसे संकलित केले.

शिवसेनेच्या आंदोलनानंतरही निकृष्ट साहित्य
नवी मुंबई : नेरूळमधील तेरणा व्यवस्थापनाने शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची करायची असल्याचे कारण देवून पालकांकडून शैक्षणिक साहित्यासाठी पैसे संकलित केले. प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. गणवेशाचा रंग उडाला असून शिलाई उसविली आहे. फाटलेले दप्तर घेवून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत आहे. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शिवसेनेने मौन बाळगल्यामुळे त्यांच्या हेतूवरच संशय व्यक्त केला जात आहे.
शाळा व्यवस्थापनाने गतवर्षी परीक्षा होण्यापूर्वी पालक सभा घेवून पुढील वर्षासाठी गणवेश, दप्तर, पीटीचा गणवेश, बुट व मोजे शाळेच्यावतीने देण्यात येणार असून त्यासाठी २५०० रूपये शुल्क आकारण्यात येणार असल्याचे सांगितले. जास्तीत जास्त २०० ते ३०० रूपये वाढीव पैसे घेतले जातील असे सांगितले होते. शुल्क वाजवी असल्याने पालकांनी होकार दिला. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पैसे भरावयास लावले. पण शाळा सुरू झाल्यानंतर गणवेश घेण्यासाठी गेलेल्या पालकांना पुन्हा २ ते अडीच हजार रूपये भरावे लागतील असे सांगण्यात आले. व्यवस्थापनाने अडवणूक केल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पालकांच्या नाराजीमुळे राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक सूरज पाटील यांनी व्यवस्थापनाची भेट घेवून फी कमी करण्याची मागणी केली होती. व्यवस्थापनाने किमान ५०० रूपये कमी करण्याची तयारी दर्शविली होती. राष्ट्रवादीला श्रेय मिळू नये यासाठी शिवसेना पक्षाचे उपनेते विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन केले. व्यवस्थापनास धारेवर धरले. पण नंतर या विषयाचा पाठपुरावा केलाच नाही. यामुळे शाळा व्यवस्थापनाने एक रूपयाही कमी न करता शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांच्या गळ्यात मारले.
शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची बनविण्यासाठी जादा पैसे घेवून दिलेले शैक्षणिक साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे सहा महिन्यात स्पष्ट झाले आहे. गणवेशाचा रंग उडाला आहे. गणवेश धुतल्याने तो आकसला आहे. अनेकांनी गणवेश उसविले असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. मुलांना वितरीत करण्यात आलेल्या दप्तरांची शिलाई एक महिन्यामध्ये उसविली आहे. अनेकांनी फाटलेले दप्तर हाताने शिवून ते वापरण्यास सुरवात केली आहे. पीटीच्या गणवेशाचा दर्जाही ठीक नाही. जादा पैसे देवून निकृष्ट साहित्य घ्यावे लागल्याने पालकांनी उघड नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. (प्रतिनिधी)
आंदोलन फक्त स्टंटबाजीसाठीच
शिवसेनेने पालकांची बाजू घेवून जोरदार निदर्शने केली होती. शाळेच्या बाहेर घोषणाबाजी करून विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला होता.
यामुळे शैक्षणिक साहित्यासाठी आकारलेले वाढीव शुल्क कमी होईल अशी आशा निर्माण झाली होती. पण प्रत्यक्षात आंदोलनानंतर शिवसेना उपनेते विजय नाहटा व त्यांच्यासोबत आंदोलनामध्ये पुढे असलेल्या एकही नेत्याने या विषयाचा पाठपुरावा केलेला नाही. यामुळे सेनेचे फक्त स्टंटबाजीसाठीच आंदोलन केल्याची भावना पालकांमध्ये निर्माण झाली आहे.